परभणीत राष्ट्रवादीला धक्का; जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा, नेमके कारण गुलदस्त्यात

| Updated on: Nov 24, 2021 | 11:22 AM

आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांना 18 नोव्हेंबर रोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ते चर्चेत होते.

परभणीत राष्ट्रवादीला धक्का; जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा, नेमके कारण गुलदस्त्यात
बाबाजानी दुर्राणी, आमदार.
Follow us on

परभणीः परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय. खरे तर कालच राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेळ लाड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा एक राजीनामा धडकलाय.

मारहाणीमुळे चर्चेत

आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांना 18 नोव्हेंबर रोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ते चर्चेत होते. दुर्राणी हे पाथरीतील कबरस्थान परिसरात समर्थकांसह उभे होते. यावेळी शहरातील मोहम्मद सईद या इसमाने दुर्रानी यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकाराने बाबाजानींचे समर्थक संतप्त झाले होते. ते हल्लखोराला धडा शिकवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, दुर्राणी यांनीच त्यांना आवरले. त्यामुळे पुढचा राडा टळला. याप्रकरणी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी पाथरी बंदची हाक दिली. त्यानंतर आता दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

संचालकपदी कायम

आमदार दुर्राणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर होते. मात्र, पाथरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी थकबाकीदार असल्याच्या कारणावरून त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद रद्द करण्याबाबत आदेश मागील सरकारने काढले होते. विशेष म्हणजे हे संचालक पद कायम ठेवण्याचे आदेश या सरकारने काही दिवसांपूर्वीच काढले होते. त्यांच्यावर कोणताही संबंध नसताना चुकीचे कारण दाखवून संचालकपद रद्द केल्याचा आरोप झाला होता.

नेमके कारण काय?

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांनीही रायगड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अचानकपणे त्यांनी पदत्याग केल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचे लाड यांनी सांगितले आहे. त्यापाठोपाठ दुर्राणी यांनी दिलेला राजीनामा चर्चेत आहे. विशेषतः मारहाणीनंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्या मागचे नेमके कारण काय, अशी चर्चा आता सुरू आहे.

फुटीचे बीज पूर्वीच

परभणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपू्र्वी फूट पडल्याचे उघड झाले होते. जिल्हाध्यक्ष आणि आमदार असणारे दुर्राणी शहरात विनाकारण हस्तक्षेप करतात. नगरसेवकांना कामे करू देत नाही, असा आरोप करत महानगर अध्यक्ष अॅड. स्वराजसिंह परिहार यांनी राजीनामा दिला होता. दुर्राणी विरोधकांचा त्यांच्यावर मनमानी कारभाराचाही आरोप होता. या साऱ्या प्रकरणावर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा सुरू आहे.

इतर बातम्याः

वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी राहुरीचा शेळके, अधिसभेवर तिघांची वर्णी