पाऊस पडण्यासाठी प्रार्थना, परळीत मंदिरच पाण्याने भरवलं

| Updated on: Jul 03, 2019 | 9:49 PM

मान्सून उशिराने आल्याने पेरण्या खोळंबल्या. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी परळी तालुक्यातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील ब्रह्मेश्वराचे मंदिर पाण्याने भरुन देवाकडे साकडं घालण्यात आलं.

पाऊस पडण्यासाठी प्रार्थना, परळीत मंदिरच पाण्याने भरवलं
Follow us on

बीड : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने बऱ्याच उशिरा हजेरी लावली. एव्हाना जूनच्या पहिल्या आठवड्यात कोसळणाऱ्या मान्सूनने बळीराजाला महिन्याच्या अखेरीस दर्शन दिले. मान्सून उशिराने आल्याने पेरण्या खोळंबल्या. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी परळी तालुक्यातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील ब्रह्मेश्वराचे मंदिर पाण्याने भरुन देवाकडे साकडं घालण्यात आलं.

ब्रह्मेश्वराचे मंदिर पाण्याने भरल्यास पर्जन्यवृष्टी  होते. अशी आख्यायिका या मंदिराची आहे. जेव्हा दुष्काळी स्थिती निर्माण होते. तेव्हा शिवभक्त ब्रह्मेश्वर मंदिर पाण्याने भरतात आणि त्यानंतर निश्चित पाऊस पडतो, असा विश्वास येथील भाविकांचा आहे.

बीड जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली खरी, पण सरासरीच्या तुलनेत इथे केवळ 11.6 टक्के पाऊस झाला. यामध्ये सर्वात कमी 45.6 टक्के पाऊस हा परळी महसूल मंडळात झाला. कमी पावसामुळे पेरण्या खोळंबल्या. पावसाने कृपा दृष्टी दाखवावी याकरिता ब्रह्मेश्वराचे मंदिर पाण्याने भरण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यातील हा दुसरा भीषण दुष्काळ आहे. यापूर्वी 2015 मध्ये असा दुष्काळ पडला होता. मात्र, यंदाच्या भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षी दोन्ही हंगामातील पेरणी झाली नाही. यंदा मात्र पाऊस होईल असा विश्वास हवामान खात्याने दाखवला होता. त्यामुळे शेतकरी स्थिर होता. आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा लागला तरीही पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळेच परळीत भक्तांनी ब्रह्मेश्वर मंदिर पाण्याने भरले. राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना आता बीडमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.

संबंधित बातम्या :

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक- एका दिवसात पावसाचे 37 बळी

राज्यात 5 जुलैपर्यंत सर्वदूर पाऊस, मुंबईकरांची धाकधूक पुन्हा वाढणार