मोदी सरकारचे प्रयत्न वाखाणण्याजोगे, आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे

| Updated on: Aug 04, 2020 | 11:17 PM

"अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या मंगलप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता", अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे (Raj Thackeray on Ayodhya Ram mandir bhumi pujan).

मोदी सरकारचे प्रयत्न वाखाणण्याजोगे, आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे
Follow us on

मुंबई : “अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या मंगलप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता”, अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे (Raj Thackeray on Ayodhya Ram mandir bhumi pujan). “अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी मोदी सरकारकडून करण्यात आलेले प्रयत्न निश्चितच वाखणण्यासारखे आहेत”, अशी प्रतिक्रियादेखील राज ठाकरे यांनी ट्विटरवर दिली (Raj Thackeray on Ayodhya Ram mandir bhumi pujan).

“जवळपास तीन दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राम मंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहे त्यातील हा एक क्षण आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमावावा लागला. आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गती मिळेल. यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जे प्रयत्न केलेत ते निश्चितच वाखणण्यासारखे आहेत. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले.

“अयोध्येत उभं राहणारं राम मंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगातिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणून या क्षणाचं महत्त्व वेगळं आहे”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

“सध्या कोरोनाचं संकट आहे. पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संकटावर मात करुन भारत बलशाली होईल, याची मला खात्री आहे”, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.