आदिवासी महामंडळाचा ‘तांदूळ घोटाळा’, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड

| Updated on: Jul 21, 2019 | 10:39 AM

आदिवासी महामंडळाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. कर्नाटकातील काळ्या बाजारातील लाखो टन तांदूळ ठाणे जिल्ह्यात आणण्यात येत आहेत. श्रमजीवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला.

आदिवासी महामंडळाचा तांदूळ घोटाळा, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड
Follow us on

रायगड : आदिवासी महामंडळाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. कर्नाटकातील काळ्या बाजारातील लाखो टन तांदूळ ठाणे जिल्ह्यात आणण्यात येत आहेत. श्रमजीवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकातून हा तांदूळ येणार असल्याची माहिती मिळाली, त्यावरुन त्यांनी तांदूळ वाहून नेणारा कर्नाटकचा ट्रक अडवला. त्यानंतर हा सर्व घोटाळा समोर आला.

रायगड जिल्ह्यातील तळेगावच्या धनंजय राईस मिलच्या नावाने शहापूर शासकीय गोदामात येणारा तांदूळ हा प्रत्यक्ष कर्नाटक येथून येत असल्याचं समोर आलं आहे. या तांदळाच्या पूर्ण व्यापारात मोठा आर्थिक गैरव्यवहार असून यात अनेक अधिकारी सामील असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शासन निर्णय आणि केंद्र सरकारच्या आदेशांची पायपल्ली केल्याचं यात दिसून येतं. बारदान ऐवजी प्लास्टिक पिशव्यांमध्ये हा तांदूळ आणला जात होता. हाच तांदूळ रेशनासाठी जात असून महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ, असं धक्कादायक चित्र आहे. धनंजय मिलर्सचा तब्बल 1 कोटी 34 लाख रुपयांचा हा घोटाळा श्रमजीवीच्या तरुणांनी समोर आणला आहे.

शहापूरच्या शासकीय गोदामात गैरव्यवहाराचा हा तांदूळ येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांना मिळाली. ही माहिती मिळताच भिवंडी तालुकाध्यक्ष सुनील लोणे, मुकेश भांगरे, कामगार संघटनेचे दिलीप गोतारने, रोहित पाटील, विजय रावते आणि अन्य सहकाऱ्यांसह श्रमजीवी संघटनेच्या टीमने शहापूरच्या गोदामात धडक दिली. यावेळी याठिकाणी कर्नाटकमधील नोंदणीकृत असलेले मोठे ट्रक तांदूळ उतरवत असताना आढळले. या ट्रकमध्ये 50-50 किलोच्या 500 प्लास्टिक पिशव्या आणण्यात आल्या  होत्या.

या सर्व प्रकाराबाबत शासकीय गोदाम पालक एस. व्ही. भगत यांना विचारलं असता त्यांनी हे तांदूळ धनंजय राईस मिल यांच्यामार्फत आल्याची माहिती दिली. वाहतूक परवान्यावरही हे तांदूळ रायगडमधून आल्याचं नमूद होतं. मात्र, प्रत्यक्षात हे तांदूळ कर्नाटकवरुन आल्याचं निष्पन्न झालं.

11 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार, तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बारदान कलर कोडिंगबाबत नियमावली आहे. मात्र, त्या नियमांचा भंग करत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करुन हा तांदूळ काळ्या बाजारात जाण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे, असा आरोप श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी केला.

या भरडाई प्रक्रियेत 400 क्विंटल भाताच्या एका लॉटला 40 रुपये प्रति क्विंटल दराने 16 हजार रुपये शासनाकडून  मिळतात. तसेच, हा भात गोदाम ते मिल नेण्यासाठी शासन किलोमीटर प्रमाणे शासन दरात वाहतूक भाडे दिले जाते. या भाताच्या मोबदल्यात हाच भात मिलिंग करून अथवा मिलर्सकडे असलेला तयार तांदूळ 400 क्विंटल भाताच्या बदल्यात 270 क्विंटल म्हणजे 67% तांदूळ देण्याचे बंधनकारक असते. यात या भागातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव आणि चांगला बाजार मिळावा. तसेच येथील रेशनकार्ड धारकांना स्थानिक आणि चांगले तांदूळ मिळावे या हेतूने ही प्रक्रिया केली जाते.

या भागात पिकलेला स्थानिक तांदूळ काही अंशी तुकड्यात असला, तरी तो पोषक आणि चवीचा वाटतो. त्याच तांदळाची मागणी अनेकदा कार्डधारक करतात. मात्र, याला मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या रेशनवर चक्क कर्नाटकचा तांदूळ देण्याचे काम केले जात आहे. हा प्लास्टिक पिशव्यांमधील तांदूळ दिसायला पॉलिश दिसतो, मात्र तो खाण्यास चांगला नसल्याचं अनेकांचं मत आहे.

आज श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी हा घोटाळा उघड केला. तसेच, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांना माहिती देऊन त्यांनी पाठविलेल्या पुरवठा निरीक्षक शहापूर यांनी स्थळ पंचनामा केला आणि श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांचा आणि कर्नाटक येथील चालकाचा जबाब घेऊन सदर प्रकरणाबाबत वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचं सांगितलं. याबाबत प्राथमिक माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना या अपहाराबाबत कळवलं असल्याचं प्रमोद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. याबाबत संस्थापक विवेक पंडित आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पुढील पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी सांगितलं.

कसा होतो हा घोटाळा?

आज ज्या मिलर्सचा घोटाळा बाहेर आला, त्या धनंजय राईस मिलने महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे 20 लॉट पूर्ण केले आणि आता आणखी 54 लॉटचं काम सुरू आहे. म्हणजे तब्बल 29 हजार 600 क्विंटल भात केवळ महामंडळाचा त्यांनी घेतला. या व्यतिरिक्त दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा कार्यालय ठाणे यांच्याकडून यावर्षी 15 हजार 156 क्विंटल भाताची उचल केली. त्यातही त्यांनी कर्नाटक येथून तांदूळ आणून घोटाळा केला.

हा माल उचलताना मुरबाड येथील जवळचा मिलर्स मिलिंग करण्यास तयार असताना त्याला डावलून धनंजय मिलला काम देण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील एकूण 44 हजार 756 क्विंटल भात या धनंजय मिलर्सने उचलला. याचा मिलिंग दर 17 लाख 90 हजार 530 रुपये होतो. त्यात हा भात इथून रायगडमध्ये नेण्याचे 109 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 48 लाख 78 हजार 404 रुपये, पुन्हा तांदूळ आणण्याचे वाहतुकीचे पैसे 29 हजार 986 , क्विंटल तांदळाचे मिळणारे वाहतूक भाडे 32 लाख 68 हजार 530 रुपये, म्हणजेच एकूण 81 लाख 46 हजार 930 रुपये हे केवळ वाहतूक भाडे असेल.

या भाताच्या भरडाईला 40 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शासन पैसे देते. म्हणजेच शासनाकडून एकूण 99 लाख 37 हजार 460 रुपये हडपण्याचा धनंजय मिलरचा प्रयत्न होता. त्यात या तांदळांसाठी 60 हजार बारदान शासन देते, शासनाच्या बारदानाची किंमत 64 रुपये प्रति बारदान म्हणजेच एकूण 38 लाख 40 हजार रुपयांचे बारदान शासनाने देऊ केले आहेत. धनंजय मिलर 5 रुपये प्रति पिशवी किमतीची प्लास्टिक पिशवी वापरतात.  म्हणजे त्यासाठी केवळ 3 लाख रुपये खर्च येतो. म्हणजेच 35 लाख 40हजार रूपये निव्वळ नफा या बारदानवर कमावला जातो. असे एकूण 1 कोटी 34 लाख 77 हजार 460 रुपयांचा खुला घोटाळा हा धनंजय राईस मिलर करत आहेत.

अशा गैरव्यवहारामुळे हे मिलर्स महामंडळ आणि फेडरेशन यांच्या अधिकाऱ्यांची मर्जी राखून आहेत. परिणामी स्थानिक मिलर्सला प्रामाणिक काम करून हे काम परवडत नाही. स्थानिक ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काम करण्यास तयार असणाऱ्या मिलर्सचे खच्चीकरण करून अशा परजिल्ह्यातील धनाढ्य मिलर्सच्या तिजोऱ्या अधिकारी भरत आहेत. म्हणून हे  स्थानिक मिलर्स पुढे येत नाहीत. विशेष म्हणजे रायगडमधील हा मिलर रायगड जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख क्विंटल भात फेडरेशनने खरेदी केला असताना त्याची मिलिंग न करता हे वाहतूक खर्च हडप करण्यासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात थैमान घालत आहे. यासारखे रायगड जिल्ह्यातील इतर धनाढ्य मिलर्स देखील यात सहभागी असून तेही असाच कागदांचा खेळ करून शासनाला लुबाडत आहे.

VIDEO :