निवडणूक अधिकाऱ्यांनी जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं, आता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ : राजद

नितीश कुमार मुख्यमंत्री निवासावर बसून निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन दबाव आणत आहेत, असा आरोप राजदने केला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं, आता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ : राजद


पाटणा : तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री निवासावर बसून निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन दबाव आणत आहेत, असा आरोप राजदने केला आहे. तसेच आधी जिंकल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं, मात्र आता त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जात आहे, असाही आरोप राजदने केला (RJD and Manoj Jha allegation on Nitish Kumar of fraud in Bihar Election result).

राजदचे नेते आणि खासदार मनोज झा म्हणाले, “बिहारमध्ये येथील जनतेचं राजद सरकार स्थापन होणार आहे. हे कुणीही रोखू शकणार नाही. मात्र, पराभूत होत असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांचा विनंती आहे की त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन मतमोजणीची प्रक्रिया संथ करु नये. उशीर झाला तरी पराभव नितीश कुमार यांचाच निश्चित आहे. सध्या पोस्टल बॅलेटची मतमोजणी थांबवण्यात आली आहे. ही मतमोजणी का थांबवण्यात आली? नितीश कुमार यांनी जाताजाता आपल्या माथ्यावर आणखी कलंक घेऊन जाऊ नये.”

“आम्ही सर्वात मोठा पक्ष झालो आहोत. एकटा राजद पक्ष 86 जागांवर आघाडीवर आहे. 2 तासांमध्ये आम्ही बहुमताचा आकड्यांपर्यंत पोहचू. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार जाताजाता निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन यंत्रणेचा दुरुपयोग करतील,” असा गंभीर आरोप झा यांनी केला.

राजदने ट्विट करत म्हटलं आहे, “ही विजयी झालेल्या राजदच्या 119 उमेदवारांची यादी आहे. मतमोजणी पूर्ण होऊन हे विजयी झाले आहेत. रिटर्निंग ऑफिसरने त्यांना विजयासाठी अभिनंदनही केलं. मात्र, आता त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जात आहे. तसेच हरल्याचा दावा करण्यात येतोय. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर (ECI) देखील हे उमेदवार जिंकल्याचं दाखवलं जातंय. लोकशाहीत आम्ही अशी लूट चालणार नाही.”

“राजदचे 119 उमेदवार जिंकल्यानंतरही टीव्हीवर 109 चाच आकडा दाखवला जातोय. मुख्यमंत्री नितीश कुमार सर्व अधिकाऱ्यांना फोन करुन घोटाळ करत आहेत. अंतिम निर्णय येऊन आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन अचानक या उमेदवारांना पराभूत घोषित केलं जातंय. नितीश कुमार, सुशील मोदी हे नेते मुख्यमंत्री निवासस्थानावरील कार्यालयात बसून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. तसेच महागठबंधनला 105-110 जागांवर रोखण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप राजदने केलाय.

“कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही”

राजदने म्हटलंय, “नितीश कुमार यांच्याकडून जवळपास 10 जागांवरील मतमोजणी उशीरा करण्याचा प्रयत्न होत आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातोय. मुख्यमंत्री निवासावर बसून नितीश कुमार आणि सुशील मोदी प्रधान सचिवांपासून जिल्हा दंडाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. तसेच कमी फरक असलेल्या जागांवर जेडीयूचा विजय करण्यासाठी दबाव आणत आहेत.”

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020! 50 लाखांची मतमोजणी अद्याप बाकी, कधीही चित्र पालटण्याची शक्यता

Bihar Election Result 2020 LIVE | नितीश कुमारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, राजदचा गंभीर आरोप

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

संबंधित व्हिडीओ :

RJD and Manoj Jha allegation on Nitish Kumar of fraud in Bihar Election result

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI