Sangli Flood | चहूबाजूंनी पाणी, तीन दिवस झाडाखालील तराफ्यावर अडकून, बोट पाहून ओरडला वाचवा-वाचवा

| Updated on: Aug 10, 2019 | 12:39 PM

सांगलीवाडी इथल्या पुराने वेढलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी जात असताना, बचाव पथकाला यश धाब्याशेजारी विनायक माळी हे झाडाजवळच्या तराफ्यावर बसल्याचं दिसून आलं.

Sangli Flood | चहूबाजूंनी पाणी, तीन दिवस झाडाखालील तराफ्यावर अडकून, बोट पाहून ओरडला वाचवा-वाचवा
Follow us on

Sangli Flood सांगली : कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा (Maharashtra Flood) भीषण फटका बसला आहे. ज्यांच्याशी संपर्क होत आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली जात आहे. मात्र ज्यांच्याशी संपर्कच झालेला नाही, त्यांना मदत कुणाची आणि कशी मिळणार हा प्रश्न आहे. सांगलीत तब्बल 3 दिवस झाडाजवळच्या तराफ्यावर अडकून पडलेल्या नागरिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

सांगलीवाडी इथल्या पुराने वेढलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी जात असताना, बचाव पथकाला यश धाब्याशेजारी विनायक माळी हे झाडाजवळच्या तराफ्यावर बसल्याचं दिसून आलं. एनडीआरएफचं पथक सांगलीवाडीकडे निघालं होतं. त्या पथकाच्या बोटीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सुद्धा होते. विनायक माळी यांनी बोट पाहून आरडा-ओरडा केला. पुराने वेढलेल्या भागात नेमका आवाज कुठून येतोय हे काही क्षण कळलं नाही. मात्र लक्षपूर्वक आवाज ऐकल्यानंतर झाडाजवळ अडकलेल्या विनायक माळी यांनी आवाज दिल्याचं समजलं.

त्यानंतर तातडीने एनडीआरएफने बोट त्या दिशेने नेत, विनायक माळी यांची सुटका केली. त्यांची चौकशी केली असता, ते तीन दिवसांपासून झाडाजवळ अडकल्याचं समोर आलं. त्यांना बोटीतून तातडीने बाहेर काढून आष्टा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती खूपच भयानक आहे. 2005 मधील महापुरापेक्षा कितीतरी पटीने यंदाचा पूर भीषण आहे. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. हजारो कुटुंबं विस्थापित झाली आहेत. कृष्णा नदी 55 फुटांवर तर पंचगंगा नदी 53 फुटांवरुन वाहत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पुराचे पाणी ओसरण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. जिथे माणसांना वाचवणे कठीण होत असताना, जनावरांचं हाल काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.