मुख्यमंत्र्यांच्या पायालाही पाणी लागलं नाही, पूरग्रस्तांचा संताप, फडणवीसांविरोधात घोषणा

| Updated on: Aug 10, 2019 | 5:01 PM

सातत्याने होत असलेल्या हालअपेष्टा आणि सरकारची किचकट अटींसह दिलेली तोकडी मदत याने पूरग्रस्त चांगलेच संतापले आहेत. या संतापाचा सामना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील करावा लागला.

मुख्यमंत्र्यांच्या पायालाही पाणी लागलं नाही, पूरग्रस्तांचा संताप, फडणवीसांविरोधात घोषणा
Follow us on

सांगली : सातत्याने होत असलेल्या हालअपेष्टा आणि सरकारची किचकट अटींसह दिलेली तोकडी मदत याने पूरग्रस्त चांगलेच संतापले आहेत. या संतापाचा सामना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील करावा लागला. फडणवीस सांगली येथे पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मदत न मिळालेल्या नाराज नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपला दौरा आटोपता घ्यावा लागला.

मुख्यमंत्री पूरग्रस्त भागात भेट देण्यासाठी 30 ते 40 गाड्या घेऊन आले. त्यांनी या गाड्या सांगलीत पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदतकार्यासाठी दिल्या असत्या तर अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता, असं मत उपस्थित पूरग्रस्तांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री केवळ पाणी नसलेल्या ठिकाणी येऊन जातात आणि जेथे खरी मदतीची गरज आहे तेथे भेटही देत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या पायाला देखील पाणी लागलेले नसल्याचा आरोप करत त्यांनी पाण्यात उतरावे अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. मुख्यमंत्री केवळ भेट देतात, मात्र मदत करत नाही, असाही आरोप नागरिकांनी केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पाणी असलेल्या सांगलीवाडी भागात भेट द्या, अशी मागणी उपस्थित पूरग्रस्तांनी केली.

घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी घोषणा देणाऱ्या पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करत तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगली शहराचा आढावा घेऊन बैठक आयोजित केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले “निर्सगाच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही. आपल्याकडे पाऊस नेमका किती मिलीमीटर पडणार हे समजू शकत नाही, तांत्रिकदृष्ट्या पावसाचं प्रमाण सांगितलं जातं. कोल्हापूर आणि सांगलीतील पावसामुळे गेल्या 100 वर्षातील पावसाचे सर्व रेकॉर्ड तुटले. त्यामुळे नेमका पाऊस किती पडणार हे सांगण्या इतपत आपलं विज्ञान प्रगत नाही.”

सेल्फीवरुन गिरीश महाजनांची पाठराखण

मुख्यमंत्र्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या सेल्फी व्हिडीओबाबत विचारणा केली असता, त्यांनी गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, उलट ज्या ठिकाणी लोक पोहचू शकत नाहीत, तेथे गिरीश महाजन पोहोचले, त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांची पाठराखण केली.