‘आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला’, सुप्रिया सुळे यांची तुफान टोलेबाजी, अजित पवार यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

'सत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खाली हात आये थे खाली हात जायेंगे. माझं घर माझ्या खासदारकीवर चालत नाही. कशाला चालायला पाहिजे असे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे.

आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला, सुप्रिया सुळे यांची तुफान टोलेबाजी, अजित पवार यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
SUPRIYA SULE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar | Updated on: Feb 25, 2024 | 6:07 PM

पुणे | 25 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसते. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. अजित पवार हे बारामती लोकसभा मतदार संघात सभा घेऊन मतदार संघ पिंजून काढत आहेत. तर, सुनेत्रा पवार याही विविध कार्यक्रमांना हजेरी लावून जनतेशी संपर्क साधत आहेत. अजित पवार यांनी एका सभेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला सुप्रिया सुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझं घर माझ्या खासदारकीवर नाही चालत असा टोला त्यांनी अजितदादा यांना लगावलाय.

पुणे येथे एका सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. ‘सत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खाली हात आये थे खाली हात जायेंगे. माझं घर माझ्या खासदारकीवर चालत नाही. कशाला चालायला पाहिजे असे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. ‘आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला’ असं आहे अशी तुफान टोलेबाजी त्यांनी केली.

तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळे यांना पाठवते. ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचं आहे. माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे. नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. कॅन्टीनमध्ये बसावं लागतं, असा जळजळीत टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.

महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. त्यातले 10 विरोधातले आहेत. तर, 38 त्यांच्या बाजूचे खासदार आहेत. पण, त्या 38 पैकी एकाही खासदाराने महागाईचा ‘म’ देखील कधी काढला नाही? संसदेत चुपचाप बसतात. सुप्रिया सुळे आक्रमक भाषण करतात. पण, तुम्ही त्यावर बोलत नाही म्हणूण मी बोलते असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपवरही केली टीका

गोपीनाथ मुंडे यांचं अख्खं आयुष्य भाजपला वाढवण्यातं गेलं. आज त्यांची मुलगी अडचणीत आहे. आहे का उभा त्यांच्या पाठीमागे पक्ष? विरोधात होते तेव्हाही मुंडे साहेब लढले. पण, आज पंकजाताई बरोबर एक तरी बीजेपीचा माणूस आहे का? भ्रष्ट आरोप केलेले अशोक चव्हाण यांना तुम्ही पद देता. परंतु, ज्या माणसांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्या गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींसाठी तुम्हाला वेळ नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us