निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल

माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्याविरोधात तृतीयपंथी समाजाकडून जळगावात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल
| Updated on: May 21, 2020 | 3:55 PM

जळगाव : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्याविरोधात तृतीयपंथी समाजाकडून जळगावात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवार सुरु असताना, राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना उद्देशून निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दावर तृतीय पंथियांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी निलेश राणे यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. “मी जर तृतीयपंथियांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी केल्यानंतर निलेश राणेंनी त्यावर आक्षेप घेणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला नातू रोहित पवार यांनी उत्तर दिल्यापासून दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. या ट्विटर वॉरमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली होती.

“रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत व्यक्त केले होते. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पवार कुटुंबियांवर मनापासून प्रेम करतात. आणि हो, राष्ट्रवादी टप्प्यात आल्यावर मात्र कार्यक्रम करतात”, असं ट्विट प्राजक्त तनपुरे यांनी यांनी केलं होतं. याच ट्विटवरुन निलेश राणे यांनी तनपुरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.

संबंधित बातम्या :

काही लोकांची पातळी खालची, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, निलेश राणेंच्या ट्विटवर जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला

तुमचं काम माहीत आहे, बोलत राहिलात तर ट्रेलरही देईन, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये ट्विटर वॉर