दादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे (Tutari Express Kokan Railway).

दादर-सावंतवाडी दरम्यान 'तुतारी' एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा
सचिन पाटील

| Edited By:

Sep 23, 2020 | 8:17 PM

रायगड : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे (Tutari Express Kokan Railway). कोकण रेल्वेमार्गावर दादर ते सावंतवाडी दरम्यान येत्या 26 सप्टेंबरपासून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. तुतारी एक्सप्रेस असं या गाडीचं नाव आहे. कोकण रेल्वेमार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याने लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या मुंबईकरांना आता कोकणात जाता येणार आहे (Tutari Express Kokan Railway).

कोकण रेल्वेमार्गावर ही विशेष लोकल चालवण्याचा रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून मध्य रेल्वेमार्फत या गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. तुतारी एक्सप्रेस येत्या 26 सप्टेंबरपासून दादर ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते दादर दरम्यान दररोज धावणार आहे. विशेष म्हणजे कोकण रेल्वे मार्गावरील ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ आदी सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर या गाडीला थांबा असणार आहे. 31 सप्टेंबरपर्यंत ही गाडी मान्सूनच्या नियमाप्रमाणे धावणार आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून ही गाडी नॉन मॉन्सूनच्या वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहे. लॉकडाऊननंतर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही दुसरी प्रवासी रेल्वे असणार आहे. आज रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरक्षण असेल तरच प्रवास करता येणार

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या गाडीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी उद्या 24 सप्टेंबरपासून सर्व आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर चाकरमान्यांना गाड्यांचे बुकींग करता येणार आहे. तसेच गाडीतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला कोव्हिड नियमांचं पालन करावं लागणार आहे. तोंडाला मास्क लावून प्रवास करणं प्रवाशांना बंधनकारक असणार असून सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावं लागणार आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून सर्वच जण आपआपल्या शहरात अडकून पडले होते. कोकणातील चाकरमान्यांनाही लॉकडाऊनमुळे कोकणात जाता येत नव्हते. गणेशोत्सव काळात कोकणवासियांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रचंड कहर असल्याने अनेक चाकरमान्यांनी इच्छा असतानाही कोकणात जाणं टाळलं होतं. रेल्वे किंवा बसच्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चाकरमानीही काळजी घेत होते. मात्र, आता गणेशोत्सव संपला असून गावाकडे गेलेले अनेक चाकरमानी मुंबईत परतले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गावाकडे जाऊ न शकणाऱ्या चाकरमान्यांना आता या विशेष गाडीतून गावाला जाता येणार आहे.

संबंधित बातम्या :

सहकारी आणि खाजगी बँकेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेमध्ये प्रवासाची परवानगी, मध्य, पश्चिम रेल्वेचा निर्णय

Mumbai Rain | मुंबई मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें