पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने त्यांच्या सरकारचा बुरखा फाडला : उज्ज्वल निकम

| Updated on: Aug 23, 2020 | 3:23 PM

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा जगजाहीर झाला आहे (Ujjwal Nikam on Pakistan Government).

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने त्यांच्या सरकारचा बुरखा फाडला : उज्ज्वल निकम
Follow us on

मुंबई : पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा जगजाहीर झाला आहे. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याची कबूली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल (22 ऑगस्ट) दिली होती. मात्र, अवघ्या 24 तासात पाकिस्तान सरकारने आपल्या वक्तव्याचा घुमजाव केला आहे. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तान सरकारवर सडकून टीका केली (Ujjwal Nikam on Pakistan Government).

“पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने दाऊद इब्राहिमचे वेगवेगळ्या नावाने बनवलेले अनेक पासपोर्ट, नॅशनल आयडेंटिटी नंबर जाहीर केला. हे काल जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली असणार. त्यामुळेच पाकिस्तानने नकाराची घंटा वाजवली. पाकिस्तान सरकारवर आयसीस आणि पाकिस्तानी लष्करचं प्रचंड दडपण आहे. त्याची ही प्रत्यक्ष पावती आहे”, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली (Ujjwal Nikam on Pakistan Government).

हेही वाचा : होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

“एखाद्या सर्कशीतील जोकरप्रमाणे पाकिस्तान कोलांट्या उड्या मारण्यात पटाईत आहे. पाकिस्तानने याआधीदेखील अनेकवेळा खोटारडापणा केला. ज्यावेळेला पाकिस्तानचे धूर्त माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ भारत भेटीला आले होते त्यावेळेला त्यांनी कोण दाऊद इब्राहिम? आम्ही ओळखत नाही? आमच्या इथे राहत नाही, अशी नाटकी भाषा केली होती”, असं उज्जवल निकम यांनी सांगितलं.

“ज्यावेळी 26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी ताज हॉटेलमध्ये हल्ला केला होता, त्यावेळीदेखील कसाब आमच्या देशाचा नागरिक नाही, असं पाकिस्तानने जाहीर केलं होतं. पण पाकिस्तानच्या जिओ टीव्ही या वृत्तवाहिनीने अजमल कसाब हा फरीदकोटचा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावेळी पाकिस्तान सरकारला मान्य करावं लागलं की, तो त्यांच्या देशाचा नागरिक आहे”, असं उज्जवल निकम यांनी सांगितलं.

“26/11 हल्ल्यानंतर मी आणि भारत सरकारचे चार अधिकारी पाकिस्तानला गेलो होतो. तिथे आम्ही आठ दिवस होतो. त्यांना या हल्ल्याचा मास्टमाइंड हाफिज सईद याच्याविरोधात खटला सुरु करा, असं आम्ही सांगितलं. तेव्हा ते म्हणाले पुरावे नाहीत. ते म्हणाले तुम्ही पुरावे द्या. मी म्हटलं कट तुमच्या भूमीत रचला गेला. तुम्ही पुरावे शोधा. त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही”, असं उज्जवल निकम म्हणाले.

“त्यानंतर आम्ही भारतात आल्यानंतर 26/11 हल्ल्याच्या प्रमुख सुत्रदारांपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडली याची साक्ष घेतली. त्याने लष्कर-ए-तोयब्बा, पाकिस्तान आर्मी, आयसीस यांच्यातील असणाऱ्या मधूर संबंधाबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्याने साक्ष म्हणून डॉक्यूमेंटरी दिली”, अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.

“मुंबईत 26/11 हल्ला झाला, अजमल कसाबला पकडलं त्यावेळेला पाकिस्तानची सगळीकडे नाचक्की झाली. त्यानंतर डेव्हिड हेडलीने लष्कर ए तोयब्बाच्या ऑपरेटिव्ह कमांडरला एक ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये बडे और छोटे चाचा का क्या होगा? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी डेव्हिड हेडलीला तू बडे चाचा कुणाला म्हणतोय ते विचारलं. त्यावर बडे चाचा हाफिज सईदला तर छोटे चाचा झकी-उर-रहमान लखवीला म्हणतो, असं त्याने सांगितलं. त्यावर लष्कर ए तोयब्बाच्या ऑपरेटिव्ह कमांडरने सांगितलं की, थोडे दिन ये चलेगा फिर बंद हो जाएगा. त्यानंतर हाफिज सईदला काही दिवस नजरकैदेत ठेवलं होतं, त्यानंतर सोडून दिलं होतं”, असं उज्जवल निकम यांनी सांगितलं.

“दाऊदला भारतात पाठवलं तर त्यांची बरीच गुपितं बाहेर येतील अशी भीती आयसीस, लष्कर ए तोयब्ब, पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तान दाऊदला भारताच्या ताब्यात देणार नाही”, अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.