किचन कॅबिनेटवरील चिकटपणा आणि हट्टी डाग घासूनही जात नाही? दिवाळीपूर्वी या सोप्या ट्रिकने निघतील चुटकीसरशी!
Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना किचन कॅबिनेटवरील तेलकट चिकटपणा आणि हट्टी डाग काढणं अनेकांसाठी कठीण ठरतं. मात्र, घरात उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींच्या मदतीने हे सहज होऊ शकतं. किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी घरी क्लिनिंग सोल्यूशन कसं तयार करायचं हे जाणून घ्या.

दिवाळीचा सण जवळ येताच घराघरांमध्ये साफसफाईची लगबग सुरू होते. घरातील इतर वस्तूंसोबतच किचनची स्वच्छता करणंही महत्त्वाचं असतं. मात्र, किचनमधील कॅबिनेट स्वच्छ करणं अनेकांसाठी डोकेदुखी ठरतं. स्वयंपाक करताना उडणारे तेलाचे शिंतोडे, धूळ आणि घाणीमुळे किचन कॅबिनेटवर चिकट थर जमा होतो. वारंवार घासूनही हा तेलकट चिकटपणा सहज निघत नाही. अशा वेळी बाजारातील महागडे क्लिनर वापरण्याऐवजी घरात उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींच्या मदतीने किचन कॅबिनेट स्वच्छ करता येतात. तर जाणून घ्या दिवाळीपूर्वी किचन कॅबिनेटवरील तेलकट चिकटपणा आणि हट्टी डाग दूर करण्याची सोपी ट्रिक.
किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य
किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी बाजारातून महागडे क्लिनिंग प्रोडक्ट खरेदी करण्याची गरज नाही. यासाठी एक छोटी वाटी पाणी, डिशवॉश लिक्विडचे काही थेंब, एक स्वच्छ स्प्रे बॉटल आणि मायक्रोफायबर कापड लागेल.
घरी क्लिनिंग सोल्यूशन कसं तयार करायचं?
सर्वप्रथम एका छोट्या वाटीत पाणी घ्या. त्यात डिशवॉश लिक्विडचे काही थेंब टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या. डिशवॉश लिक्विड जास्त प्रमाणात वापरू नका. कारण त्यामुळे कॅबिनेटवर साबणाचा चिकटपणा राहू शकतो. आता तयार झालेलं मिश्रण एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा.
किचन कॅबिनेटवर हलका स्प्रे करा
किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यापूर्वी त्यावर साचलेली धूळ कोरड्या कापडाने पुसून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या क्लिनिंग सोल्यूशनचा हलका स्प्रे करा. कॅबिनेट जास्त ओलं होणार नाही याची काळजी घ्या. विशेषतः लाकडी कॅबिनेटवर थेट स्प्रे करण्याऐवजी कापडावर थोडं सोल्यूशन घेऊन स्वच्छता करा.
मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ पुसून घ्या
क्लिनिंग सोल्यूशन लावल्यानंतर मायक्रोफायबर कापडाच्या मदतीने कॅबिनेट हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे कॅबिनेटवर साचलेला तेलकट चिकटपणा आणि घाण दूर होण्यास मदत होते. विशेषतः कॅबिनेटचे कोपरे आणि हँडलच्या आसपासचा भाग व्यवस्थित स्वच्छ करा.
ओल्या आणि कोरड्या कापडाने पुन्हा पुसा
कॅबिनेटवरील घाण स्वच्छ केल्यानंतर साबणाचे उरलेले अंश काढण्यासाठी हलक्या ओलसर कापडाने पुन्हा पुसून घ्या. त्यानंतर कोरड्या कापडाने कॅबिनेट पूर्णपणे पुसा. यामुळे पाण्याचे डाग पडण्याची शक्यता कमी होते आणि कॅबिनेट स्वच्छ दिसतात.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरताना काळजी घ्या
किचन कॅबिनेटवरील हट्टी डाग काढण्यासाठी अनेक जण व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करतात. मात्र, प्रत्येक प्रकारच्या कॅबिनेटवर या गोष्टी वापरणं योग्य नसतं. काही कॅबिनेटच्या पॉलिशवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कॅबिनेटच्या मटेरियलनुसारच स्वच्छतेचा उपाय निवडा.
टीप : कोणतंही क्लिनिंग सोल्यूशन वापरण्यापूर्वी कॅबिनेटच्या एका लहान भागावर त्याची चाचणी करा. लाकडी, लॅमिनेट आणि रंग दिलेल्या कॅबिनेटच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळी काळजी घेणं आवश्यक असू शकतं.