
महिन्याचा किराणा खरेदी करायचा म्हटलं की जवळपास अनेकजण डिमार्ट, सुपरमार्केटमध्ये खरेदी करायला जातात. कारण अशा मोठ्या स्टोअर्समध्ये सामान चांगलं तर मिळतातच पण सोबतच अनेक ऑफरही असतात. त्यातल्या त्यात तर डिमार्टमध्ये सर्वात जास्त लोक खरेदीसाठी जाताना दिसतात. पण आजकाल डिमार्टमधून खरेदी करण्याच्याबाबतीत एक गोष्ट प्रामुख्यानं समोर येऊ लागली आहे. ती म्हणजे डिमार्टमधून होणाऱ्या सामानांच्या चोऱ्या. होय, हे ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी देखील हे खरं आहे. डिमार्टमध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरे असतात मग तरीही चोरीचे प्रकार कसे वाढतायत हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. पण हीच आता डिमार्टमधील कर्मचाऱ्यांचीही डोकेदुखी बनली आहे. पण नक्की अशा कोणत्या वस्तू चोरीला जात आहेत आणि कशा तसेच त्यासाठी डिमार्टने काय उपाय केले आहेत जाणून घेऊयात.
डीमार्टमधून चोरी होणाऱ्या सर्वाधिक वस्तू
डीमार्टमधून चोरी जाणाऱ्या वस्तूंमध्ये चॉकलेट्स, स्नॅक्स, परफ्यूम, कॉस्मेटिक्स आणि छोटे इलेक्ट्रॉनिक आयटम्स अशा वस्तूंचा समावेश आहे.जसं की काही ग्राहक महागडी चॉकलेट्स किंवा स्नॅक्स खरेदी करतात त्यानंतर हातात नवीन कपडे घेऊन ते ट्राय करण्यासाठी ट्रायल रूममध्ये जातात. आणि तिथेच ती चॉकलेट्स आणि स्कॅन्स खाऊन टाकतात. ट्रायल रूममध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे हे प्रकार पकडणं अवघड होतं.
अनेकजण वस्तू खिशात, बॅगमध्ये किंवा अगदी अंडरगारमेंट्समध्ये
फक्त खाण्यापुरतेच नाही, तर अनेकजण वस्तू खिशात, बॅगमध्ये किंवा अगदी अंडरगारमेंट्समध्ये लपवून बाहेर जातात. काही वेळा पालक आपल्या मुलांना शेल्फजवळच चॉकलेट खाताना पाहतात, पण बिल न देता शांतपणे निघून जातात. एवढंच नाही तर काहीजण ड्रिंकची कॅन पिऊन रिकामी कॅन पुन्हा शेल्फमध्ये ठेवतात.
डीमार्टला रोज अंदाजे 5 ते 10 हजार रुपयांचा फटका बसत
रिटेल एक्स्पर्ट्सच्या मते, अशा चोरीमुळे डीमार्टला रोज अंदाजे 5 ते 10 हजार रुपयांचा फटका बसत आहे. कॅमेरे आणि सिक्युरिटी स्टाफ असतानाही ग्राहकांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकावर लक्ष ठेवणं शक्य होत नाही. शिवाय, पकडले गेल्यावर कायदेशीर कारवाई करणे वेळखाऊ आणि खर्चिक असते
चोरी थांबवण्यासाठी डीमार्टचे उपाय काय?
त्यामुळे आता महागड्या वस्तू लॉक असलेल्या शेल्फमध्ये ठेवण्यात येत आहेत. त्या विभागात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. स्टाफला ग्राहकांवर अधिक लक्ष ठेवण्याची सूचना दिली जाते. RFID टॅग आणि स्मार्ट सेन्सर्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे चोरी काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीही कपड्यांच्या आत वस्तू लपवणे किंवा शॉपिंगदरम्यानच खाणं ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ग्राहक सरळ उलट उत्तर देतात
तसेच पकडले गेल्यावर अनेक ग्राहक सरळ उलट उत्तर देतात ‘आम्ही चोर दिसतो का?’, तर काही जण बिलिंगवेळी म्हणतात ‘भूक लागली होती म्हणून खाल्लं, विसरलो बिल द्यायला.’ अशा छोट्या पण वारंवार होणाऱ्या घटनांमुळे स्टोअरला मोठा फटका बसल्याचं रिटेल एक्स्पर्ट्स सांगतात. तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांना जागरूक करणं, कायदेशीर कारवाईची माहिती देणं आणि कठोर दंड लावणं हे उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात.