रोज जिम करता, हेल्दी खाता तरीही हृदयाला धोका? ऑफिस मधील या चुका ठरू शकतात कारण
काही लोक हेल्दी आहार घेतात आणि जिममध्ये व्यायाम करतात, तरीही त्यांना हृदयाच्या आरोग्याच्या समस्यांची भीती वाटते. यामागे कामातील काही चुका असू शकतात. चला येथे जाणून घ्या सविस्तर.

हेल्दी गोष्टी खाणे, जिममध्ये जाणे आणि धूम्रपान न करता देखील हृदयाचे आरोग्य धोक्यात राहणे ही एक मोठी चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार, ३५ वर्षांखालील ६० टक्के लोकांचा बीएमआय (BMI) सामान्य असूनही, त्यांना कार्डियोवस्कुलर-रिस्क म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका असतो. यामागे कोलेस्ट्रॉल हे एक प्रमुख कारण आहे. मॉडर्न ऑफिस कल्चर मध्ये लोक हेल्दी आहार, जिम आणि नो स्मोकिंगचा रूटीन फॉलो करतात, तरीही त्यांचा कामाचा दिवस अनहेल्दी ठरतो.
आरोग्याची काळजी घेताना काही चुका वारंवार केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. कामाच्या दबावामुळे स्ट्रेसमध्ये असलेले, अपुरी झोप घेणारे किंवा अयोग्य आहार घेणारे लोक असे असतात. येथे आम्ही तुम्हाला याच चुकांबद्दल सांगणार आहोत.
व्यायाम करणे पण तासनतास बसून राहणे
व्यायाम केल्यानंतरही बराच वेळ एकाच जागी बसून राहणे हानिकारक ठरू शकते. बैठे काम करणाऱ्या लोकांनी दर तासाला थोडा वेळ चालायला हवे. कारण बराच वेळ एकाच जागी बसून राहणे आणि त्याच वेळी जेवण करणे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
स्क्रीनकडे बघत खाणे
काही लोक लंचमध्ये पौष्टिक पदार्थ खातात, पण आपल्या जागेवर बसून स्क्रीन कडे बघत तसे करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. फोन किंवा इतर स्क्रीनकडे बघत जेवणे पचनासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही जेवणाची चव तर एन्जॉय करता, पण भूक लागल्याचे किंवा पोट भरल्याचे संकेत तुम्हाला ओळखता येत नाहीत. असे घडते कारण तुमचे लक्ष दुसरीकडे असते.
सतत तणावात असणे
दीर्घकाळ टिकणाऱ्या मानसिक ताणामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. तसेच त्यामुळे झोपेच्या चक्रातही व्यत्यय येतो. ऑफिसमधील ताण घरी घेऊन गेल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, कामाशी संबंधित ताण दीर्घकाळ धरून ठेवण्याची चूक टाळा.
कामामुळे झोपेची कमतरता
ऑफिसमधील कामाचा बोजा किंवा डेडलाइन पूर्ण करण्याचा दबाव मनावर ताण आणतो आणि त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. निरोगी आहार आणि व्यायामाच्या सवयी झोपेच्या कमतरतेची भरपाई करू शकत नाहीत. अशा सवयींचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, किमान ७ ते ८ तास स्ट्रेस फ्री झोप घेणे महत्त्वाचे आहे.