रक्तदात्यांना टायटन घड्याळाचे आमिष, एफडीएने केली मोठी कारवाई…
रक्तदान ही मानवतेची सेवा असून रक्तदात्यांना कोणत्याही प्रलोभनातून रक्तदानासाठी प्रवृत्त करू नये, अशी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे.त्यांची नुकतीच एमपीएससीच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून निवड झाली आहे. मात्र, अनेकांना एमपीएससीत चौकशीचे सचिव झाले आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने तुकाराम मुंढे त्यांच्या जागी नियुक्त झाल्याचा गैरसमज पसरला गेला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्वत:चे परवा एक्स पोस्ट टाकून आपण एफडीएमध्येच आयुक्त म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट गेले. रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना टायटन घड्याळे भेट दिल्याप्रकरणी आता एफडीएने कारवाई केली आहे.
मुंबईत एकारक्तदान शिबिरात रक्तदात्यांना टायटन घड्याळे भेट दिल्याप्रकरणी एफडीएने मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी रक्तदानासारखे प्रवित्र दान असताना त्यासाठी टायटन घड्याळे दिल्याने मुंबईतील तीन रक्त केंद्राचे परवाने निलंबित केल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील तीन रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ऐच्छिक रक्तदान शिबिरात भेटवस्तू देण्यास NBTC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधात्मक मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने ही कारवाई केली आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्तकेंद्राचा परवाना देखील 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. जे. जे. रुग्णालय रक्तकेंद्राचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. बी. वाय. एल. नायर रुग्णालय रक्तकेंद्राचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित केला आहे. या ठिकाणी एफडीएने धाड टाकताच तपासादरम्यान रक्तकेंद्रात टायटनचे घड्याळ भेट दिल्याने नियमांचे उल्लंघन केले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणीनंतर एफडीएकडून त्यांचे परवाना निलंबनाचे आदेश देण्यात आले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. आणि नायर रुग्णालय रक्तकेंद्राच्या प्रशासनाने राज्य शासनाकडे अपील करण्यात आले आहे. दोन्ही रक्तकेंद्रांना निलंबन आदेशाविरोधात तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. रक्तदान ही मानवतेची सेवा असून रक्तदात्यांना कोणत्याही प्रलोभनातून रक्तदानासाठी प्रवृत्त करू नये, अशी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. रक्तदानासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश एफडीए आयुक्तांनी दिले आहे.