
सध्या देशभरात मॉन्सूनचा जोर सुरू आहे. पावसाने उष्णतेपासून थोडा दिलासा दिला असला, तरी हवामानातील आर्द्रतेमुळे घरात चिपचिपेपणा आणि घुसमट वाढली आहे. अशा वेळी अनेकजण एसीचा वापर करतात. पण मॉन्सूनमध्ये एसी योग्य प्रकारे न वापरल्यास वीज बिल वाढते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याबद्दल मेकॅनिकही तुम्हाला कधी सांगत नाहीत. चला, तर मग मॉन्सूनमध्ये एसी वापरताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, ते जाणून घेऊया.
मॉन्सूनमध्ये एसीच्या सेटिंग्जमध्ये काही बदल केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
1. मॉन्सूनमध्ये हवामानातील आर्द्रता जास्त असल्याने, एसीचा ‘ड्राय मोड’ (Dry Mode) वापरणे सर्वात उत्तम आहे. हा मोड खोलीतील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे चिपचिपेपणा कमी होतो आणि थंडी चांगली जाणवते. यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत नाही.
2. पावसाळ्यात हवामान दमट असल्यामुळे एसीच्या फिल्टरमध्ये धूळ आणि घाण लवकर जमा होते. यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. म्हणून मॉन्सूनमध्ये एसीचे फिल्टर नियमितपणे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.
3. अनेक लोक खोली लवकर थंड होण्यासाठी एसीचे तापमान 20 डिग्रीच्या खाली ठेवतात, पण यामुळे विजेचा वापर जास्त होतो. मॉन्सूनमध्ये 24 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान पुरेसं असतं आणि यामुळे विजेची बचतही होते.
4. एसीसोबत सीलिंग फॅन चालू ठेवल्यास थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते. यामुळे एसीला कमी काम करावे लागते आणि विजेची बचत होते.
5. रात्री झोपताना एसीचा टाइमर सेट करा, जेणेकरून खोली थंड झाल्यावर तो आपोआप बंद होईल. यामुळे अनावश्यक वीज वापरली जाणार नाही.
6. एसी चालू असताना खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा, जेणेकरून थंड हवा बाहेर जाणार नाही आणि एसीला जास्त वेळ चालावा लागणार नाही.
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही मॉन्सूनमध्येही कमी वीज बिलात चांगल्या आरोग्याचा अनुभव घेऊ शकता.