बर्फवृष्टी, रोषणाई अन् उत्सवाचा आनंद! ख्रिसमससाठी खास आहेत ‘ही’ ठिकाणं, लगेच करा जाण्याचा प्लॅन

Christmas Destination: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? हा सण खास पद्धतीने साजरा करण्यासाठी युरोपमधील ऐतिहासिक बाजारपेठांपासून ते ऑस्ट्रेलियातील उन्हाळी उत्सवांपर्यंतच्या सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घ्या.

बर्फवृष्टी, रोषणाई अन् उत्सवाचा आनंद! ख्रिसमससाठी खास आहेत ‘ही’ ठिकाणं, लगेच करा जाण्याचा प्लॅन
ख्रिसमससाठी खास आहेत ‘ही’ ठिकाणं, लगेच करा जाण्याचा प्लॅन
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 3:45 PM

ख्रिसमस हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात शहरांमध्ये आकर्षक रोषणाई, सजवलेले ख्रिसमस ट्री, बाजारपेठा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही जण कुटुंबीयांसोबत घरीच हा सण साजरा करतात, तर काही जण परदेशात जाऊन नाताळचा वेगळा अनुभव घेण्याचा प्लॅन करतात. युरोपमधील शेकडो वर्षांच्या परंपरा असलेल्या ख्रिसमस बाजारपेठांपासून ते ऑस्ट्रेलियातील उन्हाळी उत्सवांपर्यंत, जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ख्रिसमसचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता येतो. जाणून घेऊया अशाच ७ सुंदर ठिकाणांबद्दल.

स्ट्रासबर्ग, फ्रान्स

फ्रान्समधील स्ट्रासबर्ग शहरात १५७० पासून प्रसिद्ध क्रिस्टकिंडल्समारिक ख्रिसमस बाजार भरवला जातो. युरोपमधील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी ही एक आहे. या काळात ऐतिहासिक रस्ते रोषणाईने सजवले जातात. प्लेस क्लेबर येथील भव्य ख्रिसमस ट्री हे मुख्य आकर्षण असते. येथे स्थानिक बिस्किटे, हाताने बनवलेल्या सजावटीच्या वस्तू आणि हंगामी मिठाई खरेदी करता येते.

Loading...

व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहर ख्रिसमसच्या काळात सुंदर रोषणाईने उजळून निघते. रथॉसप्लात्झ येथील ख्रिसमस बाजारात भेटवस्तू, हस्तकलेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ मिळतात. सिटी हॉल पार्कमध्ये आइस स्केटिंगचाही आनंद घेता येतो. शॉनब्रुन पॅलेस येथील ख्रिसमस बाजार हेही पर्यटकांचे आकर्षण आहे.

न्युरेमबर्ग, जर्मनी

जर्मनीतील न्युरेमबर्गची ख्रिसमस बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शहरातील मुख्य चौकात भरणाऱ्या या बाजारात सुमारे १८० लाकडी स्टॉल्स असतात. येथे पारंपरिक सजावटीच्या वस्तू, खेळणी आणि मिठाई मिळते. प्रसिद्ध जिंजरब्रेड ‘लेबकुचेन’, ग्रिल्ड सॉसेज आणि गरम पेयांचा आस्वाद घेता येतो. लहान मुलांसाठी कुकी बनवणे आणि झोपाळ्यांसारखे उपक्रमही आयोजित केले जातात.

रोव्हानिएमी, फिनलंड

सांताक्लॉजला भेटण्याची इच्छा असेल, तर फिनलंडमधील रोव्हानिएमी हे उत्तम ठिकाण आहे. येथे आर्क्टिक सर्कलवर ‘सांता क्लॉज व्हिलेज’ आहे. पर्यटकांना सांताक्लॉजला भेटता येते आणि त्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधून प्रियजनांना पोस्टकार्ड पाठवता येतात. याशिवाय रेनडिअर आणि हस्की कुत्र्यांसोबत स्लेजिंगचा अनुभवही घेता येतो.

न्यूयॉर्क सिटी, अमेरिका

न्यूयॉर्कमध्ये ख्रिसमसचा उत्साह पाहण्यासारखा असतो. रॉकफेलर सेंटरमधील भव्य ख्रिसमस ट्री, आइस स्केटिंग रिंक आणि फिफ्थ अव्हेन्यूवरील सजवलेली दुकाने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. येथे हॉलिडे बाजारांना भेट देता येते, रेडिओ सिटी रॉकेट्सचा कार्यक्रम पाहता येतो. ब्रुकलिनमधील डायकर हाइट्स परिसरातील ख्रिसमस लाइट डिस्प्लेही प्रसिद्ध आहे.

क्यूबेक सिटी, कॅनडा

कॅनडामधील क्यूबेक सिटी हिवाळ्यात बर्फाच्छादित वातावरणामुळे एखाद्या परीकथेसारखे दिसते. येथील ओल्ड क्यूबेक परिसरातील ऐतिहासिक इमारती आणि सजवलेल्या गल्ल्या पर्यटकांना आकर्षित करतात. रू डू पेटिट शॅम्प्लेन आणि प्लेस रॉयल येथील रोषणाई पाहण्यासारखी असते. येथे जर्मन ख्रिसमस बाजारही भरतो. याशिवाय आइस स्केटिंग आणि इतर हिवाळी उपक्रमांचा आनंद घेता येतो.

सिडनी, ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये डिसेंबर हा उन्हाळ्याचा महिना असतो. त्यामुळे येथे थंडीऐवजी उबदार वातावरणात ख्रिसमस साजरा केला जातो. शहरातील समुद्रकिनाऱ्यालगतचे परिसर रोषणाईने सजवले जातात. ‘द रॉक्स’ परिसरातील ख्रिसमस कार्यक्रमात सजवलेल्या गल्ल्या, हस्तकलेच्या वस्तूंचे बाजार, लाइव्ह संगीत आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात. मार्टिन प्लेस येथील ख्रिसमस ट्री हेही येथील प्रमुख आकर्षण आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us