हिमाचलची ट्रीप प्लॅन करताय? भाग्यश्रीच्या ट्रॅव्हल डायरीतील ही 3 ठिकाणं नक्की पाहा
हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आणि शांत वातावरण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. तुम्हीही हिमाचलला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर भाग्यश्रीच्या ट्रॅव्हल डायरीतील ही 3 सुंदर ठिकाणं तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की समाविष्ट करा.

डोंगरांच्या कुशीत काही दिवस निवांत घालवण्याची मजा काही औरच असते. उंचच उंच पर्वतरांगा, हिरवीगार जंगलं, थंडगार हवा आणि निसर्गाचे मनमोहक दृश्य यामुळे हिमाचल प्रदेश पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. अलीकडेच अभिनेत्री भाग्यश्री कामानिमित्त हिमाचल प्रदेशला गेली होती. या प्रवासादरम्यान तिने तेथील सुंदर निसर्ग दृश्यांची झलक सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या या ट्रॅव्हल पोस्ट पाहून तुम्हालाही हिमाचलची सफर करण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे आगामी सुट्टीत हिमाचलला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथल्या या तीन खास ठिकाणांचा नक्की विचार करा. इथे निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच स्थानिक संस्कृती, ऐतिहासिक वास्तू आणि सुंदर पर्यटनस्थळे अनुभवता येतील
शिमला: डोंगररांगांचे मनमोहक दृश्य
हिमाचल प्रदेशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या शिमल्याला ‘डोंगरांची राणी’ म्हणून ओळखले जाते. उंच पर्वतरांगा, देवदाराची घनदाट झाडे आणि आल्हाददायक वातावरण यामुळे पर्यटकांना इथे फिरण्याचा वेगळाच आनंद मिळतो. शिमल्यातील मॉल रोड आणि द रिज ही प्रमुख आकर्षणे आहेत. मॉल रोडवर फिरताना अनेक दुकाने, कॅफे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. तसेच कालका-शिमला टॉय ट्रेनचा प्रवास करताना डोंगरांमधील निसर्गसौंदर्य जवळून अनुभवता येते. निसर्गासोबतच ऐतिहासिक वास्तू पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठीही शिमला उत्तम ठिकाण आहे.
मनाली: निसर्गाच्या सान्निध्यात सुट्टीचा आनंद
बर्फाच्छादित पर्वत, हिरव्यागार दऱ्या, खळाळणाऱ्या नद्या आणि थंड हवामान यामुळे मनाली पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. इथले निसर्गसौंदर्य प्रत्येक ऋतूत वेगवेगळे रूप घेते. मनालीमध्ये फिरायला गेल्यावर देवदाराच्या उंच झाडांनी वेढलेल्या परिसरातील हिडिंबा देवी मंदिराला आवर्जून भेट द्यावी. महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा हिला समर्पित असलेले हे मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लाकडी वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूचा शांत परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. याशिवाय पर्वतरांगांचे सुंदर दृश्य पाहणे आणि निसर्गरम्य परिसरात निवांत वेळ घालवणे असे अनुभवही मनालीच्या भेटीत घेता येतात.
धर्मशाळा: निसर्ग आणि तिबेटी संस्कृतीचा संगम
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा हे निसर्ग सौंदर्य आणि तिबेटी संस्कृती यांचा सुंदर संगम असलेले ठिकाण आहे. दलाई लामा यांचे निवासस्थान आणि तिबेटी संस्कृतीचे केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. धर्मशाळेतील मॅक्लोडगंज परिसर पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. इथे सुंदर मठ, छोटी दुकाने आणि कॅफे पाहायला मिळतात. शांत वातावरणात फिरण्यासोबतच तिबेटी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येतो. तसेच कांगडा कला संग्रहालयाला भेट देऊन स्थानिक चित्रकला, कलाकृती आणि ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेता येते. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच वेगळी संस्कृती अनुभवायची असेल, तर धर्मशाळेला नक्की भेट द्या.