रात्रीच्या उरलेल्या पोळ्या फेकू नका; बनवा कुरकुरीत नाचोज, शेफ संजीव कपूर यांची भन्नाट रेसिपी

रात्रीची उरलेली पोळी घरात कोणीच खायला तयार नसतात, अशावेळी तुम्ही त्यापासून कुरकुरीत नाचोज बनवू शकता. हे चविष्ट नाचोज मुलांनाही नक्की आवडतील. शेफ संजीव कपूर यांनी उरलेल्या पोळ्यांपासून नाचोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगितली आहे.

रात्रीच्या उरलेल्या पोळ्या फेकू नका; बनवा कुरकुरीत नाचोज, शेफ संजीव कपूर यांची भन्नाट रेसिपी
Nachos
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 3:44 PM

रात्रीच्या जेवणात उरलेली पोळी अनेकदा दुसऱ्या दिवशी खाल्ली जात नाही. अशा वेळी ती फेकून देण्याऐवजी त्यापासून काहीतरी चविष्ट पदार्थ बनवता येऊ शकतो. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी उरलेल्या पोळ्यांपासून कुरकुरीत नाचोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगितली आहे. हे नाचोज चटपटीत चवीचे असून चहासोबत किंवा हिरवी चटणी आणि सॉसबरोबर खाता येतात. काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा झाल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता.

नाचोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• ३ ते ४ उरलेल्या पोळ्या
• तळण्यासाठी तेल
• चवीनुसार मीठ
• वरून भुरभुरण्यासाठी चाट मसाला
• लाल तिखट
• सर्व्ह करण्यासाठी साल्सा
• ग्वाकामोले
• सॉर क्रीम (आंबट क्रीम)

Loading...

उरलेल्या पोळ्यांपासून नाचोज बनवण्याची रेसिपी

सर्वप्रथम उरलेल्या पोळ्या एकावर एक ठेवा. त्या सपाट पृष्ठभागावर ठेवून धारदार सुरीच्या मदतीने त्यांचे त्रिकोणी तुकडे करा. आता कढईत पुरेसे तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात पोळीचे त्रिकोणी तुकडे एकेक करून सोडा. पोळीचे सर्व तुकडे सोनेरी तपकिरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ते शोषक पेपरवर काढून ठेवा.

तळलेले पोळीचे तुकडे गरम असतानाच त्यावर मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरवा. हे नाचोज हलके गरम असतानाही खाऊ शकता किंवा पूर्ण थंड झाल्यावरही सर्व्ह करू शकता. त्यासोबत साल्सा, ग्वाकामोले आणि सॉर क्रीम द्या.

बनवण्यासाठी लागतो कमी वेळ

या रेसिपीची विशेषता म्हणजे ती बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तसेच रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचाही चांगला वापर होतो. त्यामुळे पुढच्या वेळी पोळ्या उरल्यास ही रेसिपी नक्की करून पाहू शकता.

कमी तेलात नाचोज बनवायचे असतील तर…

ज्यांना तेलकट पदार्थ खाणे आवडत नाही, ते एअर फ्रायरमध्ये पोळ्यांचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत भाजू शकतात. याशिवाय ओव्हनमध्येही कमी तापमानावर हळूहळू पोळ्यांचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेता येतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us