Navratri 2026: साबुदाणा भिजवण्याची कटकट विसरा, झटपट बनवा उपवासाचा आलू पराठा, ट्राय करा ही खास रेसिपी
Navratri Fasting Recipe: नवरात्रीच्या ९ दिवसाच्या उपवासात रोज तेच ते पदार्थ कंटाळा येतो. अशा वेळी तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही साबुदाणा आलू पराठा बनवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे.

नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदा काहीतरी वेगळं करून पाहा. साबुदाणा आणि बटाट्यापासून बनवलेले मऊ, लुसलुशीत पराठे हा उपवासासाठी एक चविष्ट पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, हे पराठे बनवण्यासाठी साबुदाणा आधी भिजवण्याची गरज नाही. फक्त एक कप साबुदाण्यापासून तयार होणारे हे पराठे उपवासात पोट भरू शकतात. हे पराठे दही, हिरवी चटणी किंवा उपवासाच्या भाजीसोबत सर्व्ह करता येतात. चला तर मग, जाणून घेऊया हे पराठे बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
• साबुदाणा – १ कप
• उकडलेले बटाटे – ३
• हिरव्या मिरच्या – २ ते ३
• बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे
• किसलेले किंवा बारीक चिरलेले आले – १ चमचा
• भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट – ४ चमचे
• जिरे – १ चमचा
• काळी मिरी पावडर – अर्धा चमचा
• सैंधव मीठ – चवीनुसार
• पाणी – आवश्यकतेनुसार
• पराठे भाजण्यासाठी तूप किंवा तेल
असे बनवा उपवासाचे आलू पराठे
सर्वप्रथम एका कढईत साबुदाणा घ्या आणि मध्यम आचेवर साधारण ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या. साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा. आता एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे घेऊन ते मॅश करून घ्या. त्यात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यानंतर त्यात जिरे, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले, सैंधव मीठ आणि शेंगदाण्याचे कूट घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
तयार बटाट्याच्या मिश्रणात साबुदाण्याची बारीक केलेली पावडर आणि चिरलेली कोथिंबीर घाला. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालत हे मिश्रण मळून घ्या. पीठ मऊ आणि लवचिक होईल, याची काळजी घ्या.आता पिठाचा एक गोळा घेऊन हलक्या हाताने लाटून घ्या. पराठा मध्यम जाडीचा ठेवा. आता तवा गरम करून त्यावर थोडे तूप किंवा तेल लावा. तवा गरम झाल्यावर त्यावर पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून पराठा भाजून घ्या. पराठ्याला सोनेरी रंग येईल आणि ते नीट शिजेल याची काळजी घ्या. तुमचे उपवासाचे आलू पराठे तयार आहेत. दही, हिरवी चटणी किंवा उपवासाच्या भाजीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.
