Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीसाठी वर्षावर खलबते, सहा जागांसाठी भाजपात १२ इच्छुक, कोणाला लॉटरी ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बुधवारी रात्री बैठक पार पडली आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार असून ही नावे केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात येणार आहेत.

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीसाठी वर्षावर खलबते, सहा जागांसाठी भाजपात १२ इच्छुक, कोणाला लॉटरी ?
devendra fadnavis
| Updated on: Apr 22, 2026 | 11:04 PM

भाजपाच्यावतीने विधान परिषदेसाठी कोणाला पाठवले जाणार यासंदर्भात महत्वाची कोअर कमिटीची बैठक बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडत आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपातून पाठवल्या जाणाऱ्या नावांची चर्चा या बैठकीत झाली आहे. यंदा विधान परिषदेसाठी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावणकुळे आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या वाट्याला विधान परिषदेसाठी १० पैकी ६ जागा मिळणार आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून सहा नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. उर्वरित पाच जणांच्या नावांवर चर्चा होत आहे. विधान परिषदेसाठी नावांची निवड करताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार केला जात आहे. या बैठकीत रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील,अर्चना पाटील चाकूरकर,माधवी नाईक,राम सातपुते, राजेश पांडे,संजय केणेकर,दादाराव केचे, संजय भेंडे,संदीप जोशी,दयाशंकर तिवारी आणि प्रज्ञा सातव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी नियमित निवडणूक होत आहे. तर एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे.विधान परिषदेच्या १० जागांकरीता १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि १२ मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.

९ जागांवर महायुतीचा सहज विजय

विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. या जागेची पोटनिवडणूक सुद्धा १२ मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना पोट निवडणूकीत संधी दिली जाणार आहे. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे.बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे. या १० जागांपैकी ९ जागांवर महायुतीचा सहज विजय होणार असून १ जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाणार आहे.

यांचा कार्यकाळ संपत आहे –

उद्धव ठाकरे – शिवसेना – उबाठा

नीलम गोऱ्हे  – शिवसेना

शशिकांत शिंदे  – राष्ट्रवादी – शरद पवार गट

अमोल मिटकरी – राष्ट्रवादी – अजित पवार गट

गोपीचंद पडळकर – भाजप

रणजितसिंह मोहिते-पाटील – भाजप

राजेश राठोड- काँग्रेस

प्रवीण दटके – भाजप

रमेश कराड- भाजप

 

 

Follow Us