मराठवाड्यात पावसाची 35 टक्के तूट, धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव, परिस्थिती गंभीर
मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ३५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ३५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. मराठवाड्यात सर्वाधिक ५० टक्के तूट लातूर जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये ४० टक्के, तर परभणीत ४३ टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस पडला असला, तरी तिथेही सुमारे २६ टक्के तूट कायम आहे.
टँकरने पाणी पुरवठा
पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २४६ टँकर्स सुरू ठेवावे लागले आहेत. यामध्ये सर्वाधिक १२० टँकर्स बीड जिल्ह्यात, ९६ टँकर्स छत्रपती संभाजीनगर आणि २२ टँकर्स जालन्यात सुरू आहेत.
धरणात पाणी कमी
मराठवाड्यातील ९१७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५० टक्के तूट आहे. जायकवाडी धरणात काही प्रमाणात साठा असला, तरी मांजरा धरणात अवघा १० टक्के पाणीसाठा उरल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. नद्यांमधील वाहते पाणी अडवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरमध्ये बंद केले जाणारे बंधारे यंदा जुलै-ऑगस्ट महिन्यातच बंद करण्यात आले आहेत.
मराठवाड्यामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमानमध्ये एकंदरीत ३५ टक्के तूट आहे. त्यापैकी सर्वात जास्त लातूरमध्ये ५० टक्के तूट आहे. आज रोजी ४० टक्के धाराशिवमध्ये तूट आहे.
बीडमध्ये ४० टक्के तूट आहे, परभणीमध्ये ४३ टक्के तूट आहे आणि सर्वात चांगलं जे आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये पाऊस पडलेला आहे. तरी देखील त्या ठिकाणी २६ टक्के तूट आहे, अशी माहिती यावेळी जी श्रीकांत यांनी दिली आहे.
मराठवाड्यामध्ये पावसाळ्यातही टँकर्स चालू आहेत. आज रोजी २४६ टँकर्स आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त बीडमध्ये १२०, जालन्यामध्ये २२ आणि संभाजीनगरमध्ये ९६ टँकर्सने पाणीपुरवठा होत आहे. मराठवाड्यात मोठे प्रकल्प, मध्यम, लघु आणि नदीवरील बंधारे असे ९१७ बंधारे आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये आज रोजी अपेक्षित असलेल्या पाणीसाठ्यापेक्षा या पाणीसाठ्यात ५० टक्के तूट आहे. जायकवाडी धरणामध्ये जरी पाणीसाठा असला तरी इतर मोठ्या धरणांची परिस्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती देखील यावेळी जी श्रीकांत यांनी दिली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या सर्वांना रेग्युलरली फील्ड व्हिजिट्स करणे, तालुका कृषी अधिकारी यांनी फील्ड व्हिजिट्स करून दुष्काळाची सदृश्य परिस्थिती काय आहे, पिकाची परिस्थिती काय आहे, ते अंदाज घेणे आणि त्या अनुषंगाने आज-उद्यामध्ये शासनाला एक प्राथमिक अहवाल आमच्याकडून पाठवला जाणार आहे, जो कृषी विभागाचा एक तक्ता आमच्याकडे आला आहे, त्यानुसार आम्ही अहवाल सादर करणार आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.