
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. 10 फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात होईल. बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट वाटप करण्यास सुरूवात झाली. राज्यात बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत चालणार आहेत. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकिट दिले जाणार आहे. मात्र, महाविद्यालयांना मंडळाने सूचना दिल्या आहेत की, त्यांना हे हॉल तिकिटे विद्यार्थ्यांना प्रिंट काढून द्यावीत. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हॉल तिकिटांची वाट पाहत होते. आता त्यांना हॉल तिकिट वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांना हॉल तिकिटचे प्रिंट काढून देण्यासाठी महाविद्यालयांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही.फक्त ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकिट काढून चालणार नाही तर विद्यार्थ्यांना त्या हॉल तिकिटवर मुख्याध्यापकांची सही देखील घ्यावी लागणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटवर मुख्याध्यापकांची सही नसेल तर त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो. हॉल तिकिटवर विद्यार्थ्याचा फोटो असेल त्याच्या बरोबर खाली मुख्याध्यापकांची सही शिक्का असल्यावरच हे हॉल तिकिट ग्राह्य धरले जाईल.
बारावीची परीक्षा देण्याकरिता विद्यार्थ्यांकडे हॉल तिकिट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याल परीक्षेला बसता येणार नाही. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर,मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, कोकण, मुंबई या 9 विभागांकडून घेतली जाईल.बारावीच्या परीक्षेसोबतच दहावीच्या परीक्षेचेही हॉल तिकिट विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या कॉपी मुक्त घेण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केली जात असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीचे 31 तर बारावीच्या 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. सर्वाधिक कारवाई करण्यात आलेली परीक्षा केंद्रे ही छत्रपती संभाजीनगर विभागातील असल्याचीही माहिती मिळत आहे. कॉपीमुक्त अभियान राज्यभर राबवले जात आहे. भरारी पथकांचीही संख्या वाढवली आहे. हेच नाही तर विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीने वॉच ठेवला जाईल.