कोरोनाच्या काळात काम करून घेतलं, पैसे द्यायला लाज वाटत नाही का? आशा सेविकांचा सरकारला सवाल?

| Updated on: Jan 26, 2023 | 7:46 AM

कोरोना काळात काम करून प्रोत्साहन भत्ता न दिल्यानं सरकारच्या विरोधात आशा सेविका आक्रमक झाल्या असून मुक्काम आंदोलन सुरू केलं आहे.

कोरोनाच्या काळात काम करून घेतलं, पैसे द्यायला लाज वाटत नाही का? आशा सेविकांचा सरकारला सवाल?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव ( नाशिक ) : कोरोना काळात केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळाला नाही म्हणून आशा सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पंचायत समितीच्या समोर आशा सेविकांनी मुक्काम आंदोलन सुरू केलं आहे. कोरोनाच्या काळात गावा-खेड्यात आशा सेविकांनी थेट कोरोना रुग्णाजवळ आणि त्यांच्या कुटुंबात जाऊन काम केलं आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही योजना यशस्वी करण्यात आशा सेविकांचाही मोठा सहभाग राहिला आहे. पण याच काळात प्रोत्साहन भत्ता देण्याची सरकारने घोषणा केली होती. मात्र, फक्त एक महिन्याचा प्रोत्साहन भत्ता अशा सेविकांना देण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या आशा सेविकांनी मालेगाव शहरातील पंचायत समितीच्या समोरच धरणे आंदोलन करून सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. सध्या कडाक्याच्या थंडीतही रात्रभर आशा सेविकांनी पंचायत समितीच्या बाहेर मुक्काम आंदोलन सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे आशा सेविकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण होता. त्या काळात गावपातळीवर घरोघरी जाऊन सरकारच्या योजना आणि आरोग्य तपासणी मोहिमेत हातभार लावणाऱ्या आशा सेविका प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करीत आहे.

कोरोना काळात आशा सेविकांना प्रोत्साहन भत्ता जाहीर केल्याचे आशा सेविकांचे म्हणणे आहे. त्यातील फक्त एकच महिन्याचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असं जिल्हा परिषदेकडून त्यांना सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे प्रोत्साहन भत्ता एकच महिन्यासाठी होता असा खुलासाच एक प्रकारे करण्यात आल्याने आशा सेविकांनी आक्रमक भूमिका केली आहे. तोकड्या मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांनी मानधन वाढवून देण्याच्या मागणीबरोबर प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलतांना आंदोलक आशा सेविकांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख करत सरकारला पैसे द्यायला लाज वाटते का ? अशी संतप्त प्रतिक्रिया देत जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी जारी केलेल्या पत्रकावर आक्षेप घेतला आहे.