या तालुक्याची ओळख बदलतेय… लाचखोरीत कोटीच्या कोटी उड्डाणं; सलग दुसऱ्या दिवशी ACB ची धडक कारवाई!

| Updated on: Mar 25, 2023 | 9:30 AM

दुष्काळग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या तालुक्यातील लाचखोरीचा विक्रम नव्याने चर्चेत आहे.

या तालुक्याची ओळख बदलतेय... लाचखोरीत कोटीच्या कोटी उड्डाणं; सलग दुसऱ्या दिवशी ACB ची धडक कारवाई!
परंड्यातील आरोपी हनुमंत कोलते
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संतोष जाधव, धाराशिव : मराठवाड्यातील (Marathwada) अत्यंत दुष्काळी तालुक्यांमध्ये गणला जाणारा तालुका म्हणजे परंडा (Paranda). पाण्याच्या अभावानं जेरीस आणलेल्या परंडा तालुक्याची आता नवीच ओळख होतेय. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची एकामागून एक प्रकरणं तालुक्याच्या नावावर लिहिली जातायत. गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात तालुक्याची चर्चा होतेय. धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग दुसऱ्या दिवस परंड्यात लाचखोरी विरोधात मोठी कारवाई केली आहे. दुष्काळग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या परंडा तालुक्यातील लाचखोरीच्या रकमा पाहता एक विक्रम केला आहे. 1 लाखांची लाच घेताना सरपंच पती तर 70 हजारांची लाच घेताना पोलीस पाटील जाळ्यात अडकले आहेत.

शुक्रवारी काय घडलं?

परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील पोलीस पाटील यांना 70 हजार रुपयांची लाच घेताना ACB च्या पथकानं अटक केली आहे. वाळू संदर्भात ही लाच घेतली आहे.पोलीस पाटील हरिदास हावळे यांना लाच घेताना अटक केली आहे. ढगपिंपरी गावातील चांदणी नदी पात्रातील वाळू उत्खनन करण्याचा लिलाव तक्रारदार यांना मिळाला होता. सदर वाळू घाटावर पाहणीसाठी ग्राम दक्षता समिती नेमण्यात आली होती. सदर समितीचे सदस्य हरिदास लिंबाजी हावळे, पोलीस पाटील, ढगपिंपरी , ता. परांडा, (ईतर लोकसेवक ) हे असून त्यांनी यातील तक्रारदार यांना तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खनन करताय, त्याचे फोटो काढून महसूल विभागाला पाठवतो आणि तक्रार करतो असे सांगून फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी पंचांसमक्ष यापूर्वी दोन लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे मान्य करून 70 हजार घेतले.

सरपंच पती अटकेत

परंडा तालुक्यातील रोहकल या गावात तीन जलजीवन योजनेच्या साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य द्या अशी लाच मागितली व 1 लाख रुपये घेताना सरपंच पती हनुमंत कोलते यांना अटक केली आहे. कोलते यांना धाराशिव न्यायालयाने 27 मार्चपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोलते हे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आहेत.

1 लाखांची लाच घेताना कारवाई

अन्य एका प्रकरणात तक्रारदार हे मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनीत साईड सुपर वायझर आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे काम रोहकल गावातील 3 वस्तीवर चालू आहे. यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करून देण्यासाठी लाच मागितली. यातील तक्रारदार यांना 22 मार्च रोजी चालू असलेल्या तीन साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अशा लाचेची मागणी पंचांसमक्ष केली. तडजोडी अंती 1 लाख लाच घेतली. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, पोलीस अंमलदार विष्णू बेळे,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी यांनी काम पहिले.