BPL 2025-26: मैदानात आला हार्ट अटॅक, सीपीआर दिल्यानंतर थेट रुग्णालयात केलं दाखल, पण…
Mahbub Ali Zaki: बांग्लादेश प्रीमियर लीग 2025-26 स्पर्धेत धक्कादायक प्रकार घडला आहे. ढाका कॅपिटल्स संघात त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण दिग्गजाला सामना सुरू होण्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं.

बांग्लादेश प्रीमियर लीग 2025-26 स्पर्धेला 26 डिसेंबरपासून सुरुवात झाली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एका फ्रेंचायझीने माघार घेतल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर कसं बसं सावरत बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने संघाची सूत्र हाती घेतली आणि स्पर्धेला सुरुवात झाली. पण तिसऱ्या सामन्यापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला. ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जकी यांची सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात सामन्यापूर्वीच्या तयारीवेळी तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर अस्वस्थ झाले आणि मैदानातच कोसळले. त्यानंतर मैदानात एकच खळबळ उडाली. जकी यांना तात्काळ सीपीआर दिला गेला आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फ्रेंचायझीने जकी यांना आयसीयूत भरती केल्याचं सांगितलं. पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं नंतर सांगण्यात आलं. राजशाही रॉयल्स विरुद्ध संघाच्या पहिल्या सामन्याच्या काही काळापूर्वी ही घटना घडली.
संघाने या घटनेची माहिती देताना सांगितलं की, क्रिकेट सराव सामन्यादरम्यान जकी अचानक अस्वस्थ झाला आणि जमिनीवर पडले. मैदानात त्यांना वैद्यकीय सेवा दिली गेली. इतकंच काय तर सीपीआरही दिला गेला आणि रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण फ्रेंचायझीने काही वेळानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महबूब अली जकी यांचं निधन झाल्याचं सांगितलं. ढाका कॅपिटल्सने पोस्ट करत लिहिलं की, “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की, ढाका कॅपिटल्स कुटुंबाचे लाडके सहाय्यक प्रशिक्षक हृदयविकाराने निधन झाले आहे . या कधीही भरून न येणार्या नुकसानाने आम्हाला खूप दुःख झाले आहे . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना.”
View this post on Instagram
कोण आहेत महबूब अली जकी
महबूब अली जकी हे बांग्लादेश क्रिकेटमधील दीर्घकाळ सदस्य होते. त्यांनी अनेक खेळाडूंना क्रिकेटचे धडे शिकवले. तसेच बांग्लादेश क्रिकेटच्या प्रगतीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यांच्या निधनाने बांग्लादेश क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. इतकंच काय तर संघ आणि क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. बांगलादेशने आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप 2020 जिंकला होता. त्या संघाच्या प्रशिक्षकपदाचे भाग होते. बांग्लादेश एकमेव आयसीसी चषक जिंकलेला आहे.
