
ठाण्यातील घोडबंदर रोडच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत घोडबंदर रस्त्याच्या स्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मागील काही दिवसांपासून घोडबंदर रस्त्यावर सुरु असलेल्या वाहतूक कोंडी तसेच रस्त्याची दुरावस्था ही गंभीर समस्या बनली आहे. याचा फटका आता केवळ सर्वसामान्यांनाच नाही सेलिब्रेटिंनाही बसू लागला आहे. यावरच आता अभिनेत्री रुपाली भोसलेही आवाज उठवला आहे.
रुपालीने आपल्या व्हिडिओमध्ये ‘घोडबंदर रस्त्याची काय अवस्था आहे,किती वर्ष असा प्रवास करायचा?’ असा सवाल तिने उपस्थित केला आहे. रूपाली भोसले हिने यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी विरारहून ठाण्यापर्यंत सतत प्रवास केला होता. त्या काळातही घोडबंदर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य होते आणि प्रवास त्रासदायक होता असं तिने म्हटलं आहे.
रुपाली म्हणाली की “मी आजही सांगते तेव्हाची परिस्थिती बदललेलीच नाही. रात्रभर शूटिंग करून आज सकाळी 5.30 वाजता घरी निघाले, घोडबंदर रस्त्याचे आधी ट्रॅफिक आणि मग हा सुंदर रस्ता, 12-14 तासांचे शूट आणि त्यानंतर दोन तास असा प्रवास… हे नीट कधी होणार?” असा प्रवास तिने उपस्थित केला आहे.
अभिनेत्री रूपाली भोसलेच्या आधी देखील काही कलाकारांनी अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर करत ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. रुपालीने या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे.