अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम; विखेंच्या अध्यक्षतेखाली दुसरी बैठकही निष्फळ, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
ऊसदर निश्चित करण्यासाठी प्रशासन आणि साखर कारखान्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बैठकीला मोजकेच कारखान्यांचे चेअरमन उपस्थित राहिल्याने निर्णय होऊ शकला नाही. आता उद्याच्या बैठकीत तरी ऊसदराचा तिढा सुटणार का?

कुणाल जायकर, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली. उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित करण्याचे निर्देश विखेंनी कारखान्यांच्या चेअरमनना दिले आहेत. अन्यथा ऊसाचे काटे, साखर कारखाने आणि प्रमुख महामार्ग बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा तिढा कायम राहिला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली आहे. उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित करण्याचे पालकमंत्री विखेंचे साखर कारखान्यांच्या चेअरमनना निर्देश गेले आहेत. कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दर निश्चित करणार अशी माहिती विखे पाटलांनी दिली आहे.
दरम्यान, या बैठकीला मोजकेच दोन ते तीन कारखान्यांचे चेअरमन उपस्थित होते. त्यामुळे ऊसदराचा निर्णय लांबणीवर गेल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत निर्णय न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झालेले यावेळी पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. उद्या सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उसाचे काटे, साखर कारखाने आणि जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा समोर आला आहे.