बैठकीला उपस्थित असतानाही मग मूग गिळून का बसलेलात? राम शिंदेंचा रोहित पवारांना सवाल

Ram Shinde on Rohit Pawar: जिल्हा बँक निवडणुकीवरून राम शिंदे-सुजय विखे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलेले असतानाच शिंदे यांनी आता आमदार रोहित पवार यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे अहिल्यानगरमधील राजकारणात वादाची उकळी फुटली आहे.

बैठकीला उपस्थित असतानाही मग मूग गिळून का बसलेलात? राम शिंदेंचा रोहित पवारांना सवाल
राम शिंदे, रोहित पवार
| Updated on: Sep 27, 2026 | 2:37 PM

अहिल्यानगरमधील राजकारणात नवनवीन विषयाला फोडणी बसत आहे. जातीय राजकारणापासून ते इतर मुद्यांवर रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. सहकार, शिक्षण आणि राजकारणात जिल्हा राज्याच्या नकाशावर आघाडीवर आहे. त्यातच आता महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांनी अगोदर सुजय विखे यांचे कान ओढल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. जुने जाणते नेते दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प ऐरणीवर आला आहे. त्यावरूनच शिंदे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

राम शिंदे-सुजय विखे यांच्यात शाब्दिक युद्ध

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीवरून राम शिंदे-सुजय विखे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. सुजय विखेंच्या वक्तव्यावर राम शिंदे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेचा सन्मान केला पाहिजे असे राम शिंदे म्हणाले. एकमेकांची जिरवाजिरवीचं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, असा वडील बंधूसारखा सल्लाही राम शिंदे यांनी दिला. ठेवीदार आणि कर्जदारांचं हित पाहता जिल्हा बँक बिनविरोध झाली तर चांगलंच आहे. निवडणूक प्रतिष्ठेचा विषय केला तर जिल्हा बँकेची निवडणूक होईल असे राम शिंदे म्हणाले.

रोहित पवार यांना सुनावले

डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्पावरून रोहित पवार-निलेश लंके यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर राम शिंदे यांनी चांगलेच सुनावले. प्रकल्प नेमका कोणाच्या काळात रद्द झाला, हे आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांनी तपासावं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प रद्द झाल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते, याची आठवण राम शिंदे यांनी करून दिली. त्यावेळी रोहित पवार बैठकीला उपस्थित असताना मूग गिळून का बसले होते? नाव न घेता राम शिंदे यांची रोहित पवारांवर टीका केली. आधी प्रकल्प रद्द होण्या मागचा इतिहास तपासा, मग आंदोलनाचा इशारा द्या, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला.

दिलीप वळसे पाटील यांचा आक्षेप काय?

डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे, हा बोगदा चुकीच्या पद्धतीने झाल्यास भविष्यात शेतीसमोर गंभीर जलसंकट उभे ठाकेल असा आक्षेप दिलीप वळसे पाटील यांनी या अगोदरच नोंदवला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय टाकू असेही ते म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us