Ajit Pawar Death : 8 वाजून 47 मिनिटे, अजितदादांनी केला होता कॉल, त्यानंतर…माजी आमदाराने काय सांगितलं?
अजित पवार यांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, एका माजी आमदाराने अजितदादांनी मला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत एकूण चार प्रचारसभा घेणार होते. परंतु बारामतीच्या विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही परंतु दृश्यमानता व्यवस्थित नसल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण कुटुंब आता बारामतीमध्ये पोहोचले आहे. तसेच राज्यातील सगळे मोठे नेते बारामतीत दाखल झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाबाबत माजी आमदार यशवंत माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताच्या अगोदर अजित पवार यांनी मला कॉल केला होता, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
त्याच पद्धतीने मला एक कॉल आला होता
यशवंत माने यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. ‘अजित पवार यांनी मला सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी कॉल केला होता. अजितदादा मला नेहमीप्रमाणे हॉटलाईनवरून कॉल होते. त्याच पद्धतीने मला एक कॉल आला होता. माझ्या मते तो कॉल अजित पवार यांचाच होता, असे मला वाटत आहे,’ असा अंदाज यशवंत माने यांनी व्यक्त केला. याच वेळी माझा दुसरा कॉल सुरू होता. त्यामुळे तो कॉल वेटिंगला पडला होता, असेही यशवंत माने यांनी सांगितले आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी होणार?
अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यभरातील लोक बारामतीत दाखल होत आहेत. सोबत राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही विद्या प्रतिष्ठान प्रांगणात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
