Nashik| ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत, भुजबळांच्या हाती विणा; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

| Updated on: Dec 03, 2021 | 10:36 AM

इतक्या दिवस रोज एका वादाने गाजणारे संमेलन आज मात्र मोठ्या उत्साहात आणि झोकात सुरू झाल्याचे दिसले.

Nashik| ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत, भुजबळांच्या हाती विणा; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!
नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून शुक्रवारी ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.
Follow us on

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः संगीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून प्रस्थान ठेवले. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिराण खोसकर यांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर भुजळांनी हाती विणा धरला आणि उपस्थितांनी माना डोलावल्या.

साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीवर पावसाचे सावट होते.

वादाच शेवट गोड

नाशिक येथे होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ना कोणत्या वादात अडकत आहे. थेट कौतिकराव ठाले पाटील यांनी निमंत्रकांची काढलेली खरडपट्टी असो की, अगदी काल पर्यंत नाशिचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी भाजप आमदारांना कार्यक्रमांना का बोलावले नाही, निमंत्रण पत्रिकेमध्ये भाजप नेत्यांची नावे का टाकली नाहीत म्हणून दाखवलेली नाराजी. त्यानंतर भुजबळांनी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रण. या साऱ्या वादाचा शेवट आता गोड होताना दिसतोय. महापौर सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथदिंडीला हजेरी लावून त्याचेच संकेत दिले.

ग्रंथदिंडी विद्यार्थी आणि महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

ग्रंथदिंडीचा मार्ग बदलला

नाशिकमध्ये सध्या अगदी पावसाळा सुरू असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे शुक्रवारी काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडीच्या मार्गात बदल करण्यात आला होता. कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून ग्रंथदिंडी निघाली. त्यानंतर महापौर बंगला, रेमंड सिग्नल, जुने सीबीएस सिग्नल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, नाशिक जिमखाना , सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृह वरून सार्वजनिक वाचनालय येथे विसावा झाला. त्यानंतर आता थोड्याच वेळात पालखी संमेलनस्थळी म्हणजेच कुसुमाग्रजनगरी, भुजबळ नॉलेज सिटी येथे दाखल होणार आहे.

ग्रंथदिंडीत विविध वेशभुषेत विद्यार्थ्यी उत्साहात सहभागी झालेले दिसले.

वातावरण भक्तीमय

ग्रंथदिंडीचे वातावरण अतिशय भक्तीमय झालेले पाहायला मिळाले. पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ स्वतः विना घेऊन ग्रंथ दिंडीत चालत होते. महापौर सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथ दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. माझ्या कार्यकाळात साहित्य संमेलन होणे हे भाग्य असल्याचे उदगार अगदी कालपर्यंत नाराज असलेल्या महापौरांनी काढले. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर यांनी ठेका धरलात. स्वतः पोलीस आयुक्त दीपक पांडे ग्रंथ दिंडी सहभागी झाले. पोलीस दलाच्या दक्षता मासिकाचा फलक हातात घेऊन त्यांनी जनजागृती केली. ग्रंथदिंडीत इतर पोलीस अधिकारीही सहभागी झालेले दिसले. यावेळी संस्कार निकेतन शाळेतील विद्यार्थ्यांकडून डोळ्याची पारणे फेडणारी मल्लखांब प्रात्यक्षिके केली.

डॉ. जयंत नारळीकरांची गैरहजेरी

साहित्य संमेलनाला संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची गैरहजेरी राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे. डॉ. नारळीकरांचे वय पाहता आणि सध्याची ओमिक्रॉनची भीती, पावसाळी वातावरण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षाविनाच हे संमेलन पार पडणार आहे. काहीही असो, इतक्या दिवस रोज एका वादाने गाजणारे संमेलन आज मात्र मोठ्या उत्साहात आणि झोकात सुरू झाल्याचे दिसले आहे.

इतर बातम्याः

Nashik| अहो, नाशिकचे झाले कुलू-मनाली; पावसासोबत बोचरी हुडहुडी अन् स्वेटरवर चक्क रेनकोट…!

एक पाऊल समतेचे, तेजस्विनी रणात तळपणार; नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था, पुढील वर्षी प्रवेश