Nashik| अहो, नाशिकचे झाले कुलू-मनाली; पावसासोबत बोचरी हुडहुडी अन् स्वेटरवर चक्क रेनकोट…!

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिकचे अक्षरशः कुलू-मनाली झाली आहे. तापमान थेट तेरा अंशापर्यंत खाली घसरले आहे. त्यातच वरून पावसाचा मारा. त्यामुळे शहरवासीयांना चक्क स्वेटरवर रेनकोट घालूनच घराबाहेर पडावे लागते आहे.

Nashik| अहो, नाशिकचे झाले कुलू-मनाली; पावसासोबत बोचरी हुडहुडी अन् स्वेटरवर चक्क रेनकोट...!
महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी

नाशिकः गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिकचे अक्षरशः कुलू-मनाली झाले आहे. तापमान थेट तेरा अंशापर्यंत खाली घसरले आहे. त्यातच वरून पावसाचा मारा. त्यामुळे शहरवासीयांना चक्क स्वेटरवर रेनकोट घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे. अजून दोन दिवस हा पाऊस राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिक शहरात बुधवारी रात्रभर पाऊस झाला. अधूनमधून पावसाची जोर वाढला. गुरुवारी दिवसभरही पावसाच्या सरी सुरू आहेत. जिल्ह्यात काल सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत एकूण 176.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक 19.4 आणि सिन्नरमध्ये 19 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

उद्यापर्यंत पावसाचा अंदाज

सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या 3 डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढणार आहे. बोचरी थंडी आणि पाऊस असे विचित्र वातावरण या काळात राहणार आहे. सध्या कोरोनाच्या ऑमिक्रॉन विषाणूची धास्ती साऱ्या जगाने घेतली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात अतिशय रोगट वातावरण आहे. कालही दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्येच थंडी आणि मध्येच पाऊस, अशी विचित्र अवस्था होती. या वातावरणाने लहान मुले आजारी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुख्य रस्ता ओस, ग्राहकी रोडावली

नाशिकची मुख्य बाजारपेठ पाऊस आणि थंडीने ओस पडली आहे. ग्राहकांअभावी दुकानदार बसून आहेत. पावसामुळे शहरापरिसरातून येणारी ग्राहकीही मंदावली आहे. त्यामुळे शालीमार, कॉलेजरोड, गंगापूर रोड, अशोकामार्ग, नाशिकरोड भागातही वर्दळ कमी पाहायला मिळाली. गंगाघाटावरील कालच्या बाजाराकडेही ग्राहकांनी पावसामुळे पाठ फिरवल्याचे दिसले.

शेतीचे नुकसान

ऐन हिवाळ्यात पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे शेतकरी हादरून गेला आहे. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पीक मातीमोल झाले. आता रब्बी हंगामावर अवकाळी संकट दाटून आले आहे. विशेषतः यामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचे नुकसान होणार असून, आंब्यालाही याचा तडाखा बसणार आहे

इतर बातम्याः

Nashik| मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख कौतुकास्पद, भुजबळांचे गौरवोद्गार; खेलो इंडिया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन

Nashik Corona Update: नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू; एकाचा मृत्यू, निफाडमध्ये सर्वाधिक 97 रुग्ण

Published On - 4:18 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI