
पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा सासरा, सासू , पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे. यापैकी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सध्या पोलीस कोठडीत आहेत, तर सासू, नणंद आणि पती हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
दरम्यान हे प्रकरण ताजं असतानाच आता हगवणे कुटुंबाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा लावला होता, राजेंद्र हगवणे याचा पुतण्या संतोष हगवणे यांनी खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अविनाश खोचरे पाटलांचे लाखो रुपये थकवल्याचा आरोप आहे. आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप देखील अविनाश पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती, तसेच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात देखील तक्रार केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाँच झालं होतं.
जेसीबी व्यवहारातही फसवणूक
दरम्यान वैष्णवीचा पती शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहारातही फसवणूक केल्याचा आरोप आहे, शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशांत येळवंडे यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. प्रशांत येववंडे यांनी केलेल्या दाव्यानुसार 25 लाखांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता, त्यानुसार सुरुवातीला शशांक याला पाच लाख रुपये देण्यात आले, त्यानंतर बँकेचे हाफ्ते भरण्यासाठी ते शशांकला दर महिन्याला 50 हजार रुपये देत होते. मात्र त्याने हाफ्ता न भरल्यानं बँकेनं हा जेसीबी जप्त केला. त्यांनंतर शशांक हगवणेनं हा जेसीबी सोडवून आणला, मात्र आपले पैसे परत केले नसल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केला आहे. एकूण 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.