पाकीट, साड्या वाटणारा, जेवणावळी देणारे… अमरावती शिक्षक मतदारसंघात गाणार आणि तायडेंनी विरोधकांची अशी लायकी काढली
Amravati Teachers Constituency Election: अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांविरोधात जोरदार हल्लाबोल सुरू असताना अपक्षांनीही मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Amravati Teachers Constituency Election: अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. बंडखोरीचे वादळ आणि मनधरणी करण्यात पक्ष नेत्यांची ऊर्जा खर्ची झाली आहे. आता शिक्षक मतदारसंघाचा गड सर करण्याचा आवाहन समोर आहे. गाणार आणि तायडे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पाकीट आणि साड्या वाटणाऱ्यांची प्रतिनिधी होण्याची लायकी आहे का असा सवाल माजी आमदार गाणार यांनी केला आहे. तर विधान परिषदेत राजकीय पक्षांचा शिरकाव नको, अशी मोठी मागणी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे यांनी केली आहे.
प्रतिनिधी होण्याची लायकी आहे का?
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. संगीता शिंदे यांच्या प्रचार सभेत माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार आणि मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आमचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे; पाकीट, साड्या वाटणारा, जेवणावळी घालणारा आणि नको ते प्यायला देणाऱ्यांची आमचा प्रतिनिधी होण्याची लायकी आहे का? असा सवाल ना. गो. गाणार यांनी उपस्थित केला.
दत्तात्रय लहानेंची देशापांडेंवर टीका
अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीत देशपांडेंविरोधात लहाने असा समाना रंगला आहे. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक की श्रीकांत देशपांडे मतदारांमध्ये संभ्रम असल्याची टीका ठाकरे गटाचे उमेदवार दत्तात्रय लहाने यांनी केली. भाजपने बंडखोरांवर कारवाई केली मग शिंदेंच्या शिवसेनेने बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यावर कारवाई का केली नाही? असा सवाल लहाने यांनी केला. अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे.
अमरावतीत 26 उमेदवार रिंगणात
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात 26 उमेदवार रिंगणात आहेत. पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे नितीन आगे, तसेच अपक्ष उमेदवार सजील खान यांनी उमेदवारी मागे घेतल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. पण आजी-माजी आमदारांनी अजूनही उमेदवारांची चिंता वाढवलेली आहे.
