
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी चालू आहे. हगवणे कुटंबाने आपल्या वकिलामार्फत पहिल्याच सुनावणीत धक्कादायक दावे केले आहेत. वैष्णवी अन्य मुलाला चॅटिंगवर बोलायची, असा दावा हगवणेच्या वकिलाने केलाय. तसेच आमच्याकडे पाच कोटींच्या फक्त गाड्या आहेत, असा दावा हगवणे कुटंबाने केलाय. तसेच आम्ही 40 लाखांच्या गाडीसाठी कशाला तिचा छळ केला असता, असंही हगवणे कुटंबाने न्यायालयात म्हटलंय. याच मोठ्या दाव्यांनंतर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणेंच्या दाव्यांची चिरफाड केली. त्यांनी हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या कार नाहीयेत, असं अनिल कस्पटे यांनी सांगितलंय.
आम्ही वैष्णवीचा छळ केला नाही, असं ते म्हणत आहेत. गाडीसाठी तिचा छळ केला नाही, असंही ते सांगत आहेत. हे सांगतानाच ते आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, असंही ते सांगत आहेत. मी एमजे हेक्टर गाडी बुक केली होती. फॉर्च्युनर गाडी घेण्याच्या अगोदर मी वाकडच्या शोरुमला ही गाडी बुक केली होती. त्यासाठी 50 हजार रुपये डिपॉझिट केले होते. त्याची पावती माझ्याकडे आहे, असा खुलासा अनिल कस्पटे यांनी केला.
तसेच पुढे बोलताना शशांक हगवणे यांनी माझ्याशी वाद घातला. मला एमजे हेक्टर गाडी दिली तर मी ती घेणार नाही. त्या गाडीला तिथेच पेटवून देईन, असं शशांक हगवणे मला म्हणाला होता. मला फक्त फॉर्च्युनर गाडीच पाहिजे, असं तो म्हणत होता. त्यानंतर मी लग्नात फॉर्च्युनर गाडी दिली, असा खुलास अनिल कस्पटे यांनी दिला.
आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, असा दावा हगवणे कुटंबीय करत आहे. पण त्यांच्याकडे एकच गाडी आहे. त्यांच्याकडे पाच गाड्या नाहीत. त्यांच्याकडे निव्वळ आणि निव्वळ फोर्ड गाडी आहे. ती गाडी बुचडे नावाच्या इसमाची गाडी आहे. चंद्रकांत बुचडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी आहे. ती गाडी पोलीस ठाण्यात लावलेली आहे. म्हणजेच त्यांच्याकडे एकही गाडी आहे, असाही खुलासा त्यांनी केला.
मी दिलेली फॉर्च्युनर गाडी ही स्वखुशीने दिलेली नाही. तर मला ती गाडी मागण्यात आलेली आहे. मी लग्नाला उभं राहणार नाही. लग्न मोडून टाकेन अशी धमकी ते देत होते. अगोदरच माझ्या मुलीची दोन लग्न मोडली. त्यातही मला हे लग्न जबरदस्तीने करावं लागलं. माझ्याकडे सोन्याची, चांदीची, गाडीची मागणी केली, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला.