मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होतो, पण त्यांना मोदींचा वाण नाही, गुण लागलाय : अण्णा

मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होतो, पण त्यांना मोदींचा वाण नाही, गुण लागलाय : अण्णा

अहमदनगर : राफेल करार तसेच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतीमालाच्या हमी भावावरून केंद्र आणि राज्य सरकारला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चांगलंच धारेवर धरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मोदींप्रमाणे वागू लागले. मुख्यमंत्र्यांना मोदींचा वाण नाही, पण गुण लागलाय, अशी टीका त्यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचं गाव राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी नाकारणे याचाच अर्थ राफेलमध्ये काहीतरी तथ्य असावे, अशी शंका अण्णांनी व्यक्त केली. तर सरकारला चौकशीची भीती का वाटते, असा सवाल अण्णांनी व्यक्त उपस्थित केलाय. राफेल प्रकरण हा देशाला धोका आहे, त्यामुळे आपण या संदर्भात माहिती घेत असून त्यानंतर स्पष्ट शब्दात यावर बोलू असे अण्णांनी सांगितलं.

मोदींवर टीका करताना अण्णांनी त्यांची नक्कल केली. मोदींनी निवडणुकीत आणि नंतरही खूप चांगली भाषणे केली. पण कथनी प्रमाणे ते वागत नाहीत. भाषणात ते चांगला अभिनय करून बोलतात, पण आता त्यांच्या बद्दलच्या आशा मावळल्या आहेत. माझ्या आंदोलनाचेही त्यांनी कौतुक करत भाषणे गाजवली, पण कायदा होऊनही ते लोकपाल आणू शकले नाहीत. त्यांची नियत चांगली नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.

मोदींची हुकमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. सीबीआयच्या संचालकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे मोदी सरकारला खरमरीत चपराक असल्याचं अण्णांनी म्हटलंय. केंद्र सरकारची खोटी आश्वासने, चुकीचे लादलेले निर्णय म्हणजे हे देशाला लोकशाहीतून हुकूमशाहीकडे नेत आहेत, अशी जोरदार टीका अण्णांनी केली.

लोकपालची नियुक्ती आणि लोकायुक्त कायद्याची निर्मिती होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णा येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषण आंदोलनाला बसणार आहेत. यासाठी अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलंय. तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होतो. मात्र मुख्यमंत्र्यांना मोदींचा वाण नाही, पण गुण लागलाय, अशी जोरदार टीका अण्णानी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI