
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. आज अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा आहे, यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आज आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, त्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे, आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, आता सामंत यांनी केलेल्या दाव्यानुसार आज आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो.
नेमकं काय म्हणाले सामंत?
अमरावतीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा आहे, या मेळाव्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती आहे. मात्र दुसरीकडे शिवसेुना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे या मेळाव्याला उपस्थित नसल्यानं संजय गायकवाड हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर स्पष्टीकरण देताना उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आज आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, त्या कार्यक्रमात बुलढाण्यात संजय गायकवाड आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज आता आणखी एक मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीपासून ते आतापर्यंत अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, यामध्ये राज्यातील अनेक प्रमुख महापालिका निवडणुकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकांपूर्वी पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे.