एसटीने महिलांना अर्धे तिकीट आकारल्याने, महामंडळाला महानगर क्षेत्रात असा होणार फायदा

| Updated on: Mar 24, 2023 | 2:20 PM

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) परिसरात एसटीला महिला प्रवासी संख्या वाढवण्यास चांगली संधी आहे. त्यामुळे महामंडळाचा असा फायदा होणार आहे.

एसटीने महिलांना अर्धे तिकीट आकारल्याने, महामंडळाला महानगर क्षेत्रात असा होणार फायदा
MSRTC
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : एसटी महामंडळाने महिलांना अर्धे तिकीट आकारणारी ‘महिला सन्मान योजना’ जाहीर केल्यानंतर एसटीचे प्रवासी वाढत आहे. या महिला सन्मान योजनेमुळे एसटी जरी अर्धे तिकीट आकारत असली तरी तिकीटाची अर्धी रक्कम राज्य सरकार देणार असल्याने मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत असलेल्या एसटीला धुगधुगी आली आहे. एसटी महामंडळाने गेल्यावर्षी 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना जाहीर केल्याने एसटीचे प्रवासी वाढत आहेत. आता महिला सन्मान योजनेता एमएमआर रिजनमध्ये फायदा होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मार्च रोजी महिलांना अर्धे तिकीट आकारणारी ‘महिला सन्मान योजना’ जाहीर केली होती, त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. या महिला सन्मान योजनेमुळे महिलांना अर्धे तिकीट आकारून देखील एसटीला फायदा होत आहे. कारण तिकीटांची अर्धी रक्कम सरकार देणार आहे, त्यामुळे अंतिमदृष्ट्या सरकारलाच फायदा होत आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना जाहीर केली. त्यामुळे एसटीने कधीही प्रवास करणारे नवे प्रवासी महामंडळाला मिळाले आहेत.

एसटी महामंडळाच्या बसेसने मुंबई महानगर प्रदेशातून ठाणे, रायगड, अलिबाग या शेजारच्या जिल्ह्यातून मुंबईत येणाऱ्या महिलांना आता अर्ध्या तिकीटात मुंबईत नोकरीच्या ठिकाणी येता येणार आहे. त्यामुळे दादर- पनवेल, मुंबई- अलिबाग, मुंबई – उरण या बसेसना महिला प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे. उरण आणि अलिबाग या ठीकाणी रेल्वेची सोय नसल्याने प्रवासी रस्ते मार्गे बसने प्रवास करीत असतात. अशात आता एसटी महामंडळाने नीट नियोजन करीत या मार्गांवर जर प्रवासी फेऱ्या वाढविल्या तर महिला प्रवासी जादा मिळून एसटीला फायदा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर शहरी बस वाहतूकीपेक्षा स्वस्त प्रवास

मुंबई आणि परिसरातील उपनगरे व शहरांमधून अनेक प्रवासी वेगवेगळ्या प्रवासी वाहनातून प्रवास करत असतात. या प्रवासी संख्येमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. सध्या महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटीचे तिकीट कमी झाल्यामुळे एसटीचा प्रवास हा इतर शहरी बस वाहतुकीपेक्षा तुलनेने स्वस्त झाला आहे. त्याचा फायदा एसटीला घेता येणे शक्य आहे. या परिसरात मुंबई व ठाणे विभागाच्या बसेस धावतात. अशा 40 ते 42 मार्गावर दिवसभरात एसटीच्या 1 हजार फेऱ्या होतात. त्यामुळे भविष्यात या मार्गावर महिला प्रवाशांच्या माध्यमातून एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.

महिलांसाठी असे दर कमी झाले 

मुंबई – अलिबाग साधी बस – 160 रू. – महिलांसाठी – 80 रू.,
मुंबई – भिवंडी साधी बस – 110 रू. – महिलांसाठी – 55 रू.,
परळ – अलिबाग साधी बस – 150 रू. – महिलांसाठी – 75 रू.,
दादर – पनवेल साधी बस – 60 रू. – महिलांसाठी – 30 रू.,
दादर – बेलापूर साधी बस – 20 रू. – महिलांसाठी – 10 रू.,
पनवेल – ठाणे साधी बस – 55 रू. – महिलांसाठी – 25 रू.,
पनवेल – वाशी साधी बस – 30 रू. – महिलांसाठी – 15 रू.,
उरण – दादर साधी बस – 90 रू. – महीलांसाठी – 45 रू.,
ठाणे – बोरीवली साधी – 45 रू. – महिलांसाठी – 25 रू.,
उरण – बोरीवली साधी – 125 रू. – महिलांसाठी – 60 रू..