Aurangabad Corona Update : कोरोना रुग्णाचा शौचालयात मृत्यू! औरंगाबाद जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Mar 30, 2021 | 12:04 AM

औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयात गुदमरुन मृत्यू झाला आहे.

Aurangabad Corona Update : कोरोना रुग्णाचा शौचालयात मृत्यू! औरंगाबाद जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
कोरोना रुग्ण प्रतिकात्मक फोटो
Follow us on

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही मोठी वाढ होत आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याची अनेक उदाहरणं सध्या पाहायला मिळत आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील अशीच विदारक स्थिती सांगणारे काही फोटो समोर आले होते. आता औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयात गुदमरुन मृत्यू झाला आहे. (Corona patient dies in toilet of Aurangabad district hospital)

गुलाबराव ढवले असं मृत रुग्णाचं नाव आहे. रात्रीच्या सुमारास हा रुग्ण शौचालयात गेला. तब्बल साडे चार तास हा रुग्ण परत न आल्याने आजूबाजूच्या रुग्णांनी रुग्णालय प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तपास केला असता शौचालयाचं दार आतून बंद असल्याचं पाहायला मिळालं. शौचालयाचं दार तोडून रुग्णाला बाहेर काढण्यात आलं. तपासानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. रुग्णालयात चक्कर येऊन पडल्यानंतर त्या रुग्णाला ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे गुदमरुन ढवळे यांचा शौचालयातच मृत्यू झाला.

रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण

या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित रुग्ण सकाळच्या राउंडला आढळून आला नाही. त्यानंतर तो शौचालयात असल्याचं स्पष्ट झालं. तेंव्हा रुग्णाचा मुलगा आणि डॉक्टरांनी दार तोडून त्यांना बाहेर काढलं आणि उपचार सुरू केले. मात्र, उपचाराला साथ न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल

रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील विदारक चित्र मांडणारे काही फोटो ट्वीट केलेत. या फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

आमदार श्वेता महालेंची राज्य सरकारवर टीका

“सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील. तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती”, असं ट्वीट करत श्वेता महाले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.

संबंधित बातम्या : 

Aurangabad Lockdown : ‘उद्योजकांना खुश करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय’, इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा

शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?

Corona patient dies in toilet of Aurangabad district hospital