औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, चंद्रकांत खैरेंची ज्योतिरादित्य शिंदेना मागणी, दिल्लीत भेट

| Updated on: Feb 16, 2022 | 3:04 PM

राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली असली तरी त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता सदर नामांतर प्रकरणी भाजपकडून मंजुरी मिळणे बाकी असल्याने शिवसेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, चंद्रकांत खैरेंची ज्योतिरादित्य शिंदेना मागणी, दिल्लीत भेट
दिल्लीत चंद्रकांत खैरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्यात यावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. दिल्लीत त्यांनी केंद्रीय विमान उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांची भेट घेतली. तसेच शहरातील विमानतळाचे (Aurangabad Airport) नाव बदलण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना रितसर पत्रच लिहिले आहे. आता केंद्रातील भाजप सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विमानतळ नामांतराचा मुद्दा उचलून धरला जाणार, असे दिसत आहे.

नामांतरावरून शिवसेना विरुद्ध भाजप

औरंगाबादेत निवडणुका जवळ येतात तसे दोन नामांतराचे वाद नेहमी उफाळून येतात. यात एक म्हणजे औरंगाबाद शहारचे नाव संभाजीनगर करावे आणि दुसरे म्हणजे औरंगाबाद विमानतळाचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावे. पूर्वी शिवसेना आणि भाजप या दोघांनी ही मागणी लावून धरली होती. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे शिवसेनेने शहराचे नाव बदलण्यासाठी तर भाजपने विमानतळाचे नाव बदलण्यासाठीची सावध भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेने आधी शहराचे नाव बदलून दाखवावे, अशी मागणी भाजपकडून होते तर भाजपने आधी विमानतळाचे नाव बदलावे, अशी मागणी शिवसेनेकडून होते. आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रातील भाजप सरकारकडे पुन्हा एकदा विमानतळाचे नाव बदलण्यासंदर्भात मागणी केली आहे.

काय आहे विमानतळ नामांतराचा मुद्दा?

21 नोव्हेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विमान उड्डयण मंत्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते औरंगाबादमधील ‘औरंगाबाद विमानतळ’ चे उद्घाटन झाले. त्यानंतर शहरातील विविध पक्षांनी विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. अखेर 05 मार्च 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली असली तरी त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता सदर नामांतर प्रकरणी भाजपकडून मंजुरी मिळणे बाकी असल्याने शिवसेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे. मध्यंतरी शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लावली होती. त्यावेळी झालेल्या भाषणातदेखील उद्धव ठाकरे यांनी आधी विमानतळाचे नाव बदलून दाखवा, असा टोला भाजपला लगावला होता.

इतर बातम्या-

अबब… महिलेच्या पोटातली गाठच 47 किलोची? अहमदाबादमधल्या डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न!

बदनापूरचे आमदार नारायण कुचेंच्या भावाची तरुणाला जीवे मारण्याची धमकी? काय आहे प्रकरण