Aurangabad Tourism | दौलताबादच्या अभेद्य कालाकोट दरवाजाचे प्रथमच संवर्धन, सागवानाच्या फळ्यांनी करणार डागडुजी

देवगिरी किल्ल्यात महाकोट दरवाजातून प्रवेश करून पुढे गेल्यावर हेमाडपंथी मंदिराच्या बाजूला कालाकोट दरवाजे आहेत. शत्रूला संभ्रमात टाकण्यासाठी पूर्वी येथे तीन दरवाजे केले असल्याचे इतिहासाचे अभ्यासक सांगतात.

Aurangabad Tourism | दौलताबादच्या अभेद्य कालाकोट दरवाजाचे प्रथमच संवर्धन, सागवानाच्या फळ्यांनी करणार डागडुजी
दौलताबाद किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 2:00 AM

औरंगाबादः शहराचा इतिहास बुलंद आवाजात सांगणारा दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort). एकेकाळी अभेद्य, अजिंक्य राहण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला औरंगाबादच्या ऐतिहासिक (Aurangabad Tourism) पर्यटनस्थळांमध्ये महत्त्वाचा मानला जातो. याच दौलताबादच्या किल्ल्याला अभेद्य ठेवण्यात मोलाची कामगिरी बाजवणाऱ्या कालाकोट दरवाजाचीही तितकीच ख्याती आहे. भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे सध्या या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. किल्ल्याच्या इतिहासात (History) प्रथमच या दरवाजाची डागडुजी केली जात आहे. सुमारे महिनाभर हे काम चालणार असून यासाठी खास राजस्थानातून कारागीर आले आहेत.

छोटा कालाकोट दरवाजाची दुरुस्ती

देवगिरी किल्ल्यात महाकोट दरवाजातून प्रवेश करून पुढे गेल्यावर हेमाडपंथी मंदिराच्या बाजूला कालाकोट दरवाजे आहेत. शत्रूला संभ्रमात टाकण्यासाठी पूर्वी येथे तीन दरवाजे केले असल्याचे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. आता यापैकी दोन दरवाजे उरले आहेत. यातील एकाची अवस्था चांगली आहे. मात्र या दोनपैकी छोटा कालाकोट दरवाजाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती संवर्धन सहायक संजय रोहनकर यांनी दिली.

नव्या सागवानाच्या फळ्या लावणार

मागील अनेक वर्षांपासून हा दरवाजा नादुरुस्त अवस्थेत होता. त्यामुळे रात्रीच्या वेळीही तो उघडाच ठेवावा लागायचा. दरवाजे पकडून ठेवण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी भागही खराब झाला होता. त्याच्या अनेक फळ्याही तुटल्या होत्या. आता संपूर्ण दरवाजा बदलणार असून तुटलेल्या फळ्यांच्या जागी सागवानाच्या नवीन फळ्या बसवल्या जाणार आहेत. त्यामुळे दरवाजाच्या सौंदर्यात वाढ होणार आहे.

महिनाभरात दुरुस्ती होणार

संजय रोहनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दरवाजा दुरुस्तीसाठी राजस्थानमधून पाच तज्ज्ञ कारागीर मागवण्यात आले आहेत. स्थानिक कारागीर त्यांना मदत करत आहेत. उभ्या दरवाज्यावर काम करणे अवघड जात असल्याने हा दरवाजा बाहेर काढून त्यावर काम केले जात आहे. हे काम जवळपास महिनाभर चालेल. त्यानंतर पर्यटन स्थळे सुरु झाल्यानंतर नागरिकांना नव्याने तयार झालेला हा दरवाजा दिसेल.

इतर बातम्या-

अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ

Student Protest : Student Protest : ‘रुको जरा सबर करो’ म्हणणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला विद्यार्थी आंदोलन प्रकरण भोवणार? अटकेची शक्यता