Aurangabad | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात औरंगाबादेत भव्य मोर्चा, तारीखही ठरली, 23 मे रोजी भाजपचा हल्लाबोल

| Updated on: May 10, 2022 | 3:47 PM

येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहरात भव्य मोर्चा निघेल. शहरातील पैठण गेट परिसरातून निघालेला हा मोर्चा महापालिका आयुक्तालयाच्या कार्यालयावर धडकणार आहे.

Aurangabad | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात औरंगाबादेत भव्य मोर्चा, तारीखही ठरली, 23 मे रोजी भाजपचा हल्लाबोल
Follow us on

औरंगाबादः शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्या विरोधात भाजपने (BJP) मोठं आंदोलन छेडलं असून आता खुद्द भाजपचे फायरब्रँड नेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. मागील आठवड्यात शहरातील सिडको एन-7 भागातील जलकुंभावर भाजपच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मोठं आंदोलन केलं. शुक्रवारी सकाळच्या वेळी सुरु झालेलं आंदोलन तब्बल 30 तास चाललं. महापालिका (Aurangabad municipal corporation) अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शहरातील विविध भागात सात, आठ तर कुठे नऊ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. वाढता उन्हाळा पाहता हा पुरवठा अत्यंत कमी असल्याने तसेच वितरणातही असमानता असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.एवढी वर्ष महापालिकेची सत्ता असूनही शिवसेनेने पाणी वितरणाचा प्रश्न सोडवला नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेनेसोबत भाजपनेही अनेक वर्षे सत्ता उपभोगली आहे. तेव्हादेखील हा प्रश्न सोडवण्यात आला नाही, असं प्रत्युत्तर शिवसेना नेत्यांनी दिलं आहे. जिल्ह्यात सर्वात मोठे जायकवाडी धरण असूनही औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर स्वरुपाचा बनला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

२३ मे रोजी भव्य मोर्चा

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबदामधील पाणी प्रश्नावर आंदोलन छेडण्यात येणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करा. नऊ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो, ते तीन ते चार दिवसांवर आला पाहिजे, अशी मागणी भाजपची आहे. या मागणीसाठी आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात नुकतंच आंदोलन करण्यात आलं. आता येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहरात भव्य मोर्चा निघेल. शहरातील पैठण गेट परिसरातून निघालेला हा मोर्चा महापालिका आयुक्तालयाच्या कार्यालयावर धडकणार आहे.

पाणी प्रश्नावरून शिवसेना-भाजप आमने सामने

शहरातील पाणी प्रश्न एवढा गंभीर होण्यामागे शिवसेनेची निष्क्रियता असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर भाजपनेही मागील ३० वर्षे शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावत सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर आरोप करण्यापूर्वी स्वतः काय केले, याचे भान ठेवले पाहिजे, असा पलटवार शिवसेनेने केला आहे. यावर उत्तर देताना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, शहरातील जनतेला कळले आहे की, त्यांचे पाणी कोण चोरत आहे. सिडको जलकुंभावर फुटकळ पगारावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी महागड्या चारचाकीतून फिरत आहेत. भाजप कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करतंय हा शिवसेनेचा आरोप आहे, मात्र येत्या काळात ही टंचाई कृत्रिम आहे की नैसर्गिक हे कळेल, असा इशाराही भाजपने दिला आहे.