Aurangabad | औरंगाबाद महापालिकेची विक्रमी वसुली, पाच वर्षात प्रथमच 167 कोटींचा आकडा पार

| Updated on: Apr 03, 2022 | 6:00 AM

महापालिकेला पाणीपट्टीतून फक्त 36 कोटी रुपयेच वसूल करता आले आहेत. महापालिकेला वर्षाला 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो, पण त्याप्रमाणात नागरिक पाणीपट्टी भरत नाही. यात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा आहे.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेची विक्रमी वसुली, पाच वर्षात प्रथमच 167 कोटींचा आकडा पार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) इतिहासात प्रथमच सर्वाधिक वसुली केल्याचे समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षात महापालिकेने तब्बल 167 कोटी 18 लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. या एकूण करात मालमत्ता करातून 129 कोटी तर पाणीपट्टीतून 37  कोटी रुपये मिळाले आहेत. मागील पाच वर्षामधील हादेखील एक उच्चांक असल्याची माहित प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी दिली. कोरोना काळानंतर (Corona Pandemic) शहरात कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्येच महापालिकेने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. त्यानंतर मार्च अखेरपर्यंत १६७ कोटी रुपयांचा आकडा पार केल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष पथकाद्वारे वसुली

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मनपा प्रशासकांनी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली होती. उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाची स्थापना करण्यात आली होती. नवीन आर्थिक वर्षापासून वसुलीसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. डिसेंबरअखेरच मनपाने 100 कोटींचा टप्पा गाठला होता. मार्च अखेरपर्यंत सर्वच वॉर्डमधील कार्यालयांनी नियोजित पद्धतीने वसुलीवर लक्ष दिले. त्यामुळे प्रशासानाला हे मोठे यश मिळाल्याचे, आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. तसेच विविध ठिकाणी कर भरण्यासाठी नागरिकांना कर भरणा सुविधा केंद्र, धनादेश अनादरप्रकरणी कारवाई, प्रत्येक कर्चमाऱ्याला दिलेले उद्दिष्ट, कर तक्रार निवारण समिती, कमी वेळेत जास्तीत जास्त बिलांचे वाटप यामुळेच मोठे यश मिळाल्याचे प्रशासकांनी सांगितले.

मागील पाच वर्षातील वसुली

2017- 101.59 कोटी रुपये
2018- 104.79 कोटी रुपये
2019-136.41कोटी रुपये
2020- 114.57 कोटी रुपये
2021-136.74 कोटी रुपये
2022- 167.18 कोटी रुपये

मालमत्ता करातूनही विक्रमी वसुली

महापालिकेच्या मालमत्ता विभागाने यंदा 7 कोटी 61 लाख रुपये वसूल केले. मागील पाच वर्षामधील हादेखील एक उच्चांक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर कधीही वसूल झाला नव्हता, अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

पाणी पट्टीतून अवघे 36 कोटीच

दरम्यान, महापालिकेला पाणीपट्टीतून फक्त 36 कोटी रुपयेच वसूल करता आले आहेत. महापालिकेला वर्षाला 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो, पण त्याप्रमाणात नागरिक पाणीपट्टी भरत नाही. यात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा आहे. त्यामुळे मालमत्ता करातून होणारी वसुली या तोट्यात खर्च करण्यात येते. परिणामी विकास कामात अडचणी येत असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

इतर बातम्या-

Bhirkit Movie : गिरीश कुलकर्णी यांचा’भिरकीट’ 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, गुढीपाडव्यानिमित्त पोस्टर आऊट

Pune Murder | माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला