औरंगाबाद | अजिंठ्यातील पारोची कबर संरक्षित करण्याची मागणी, कशी बहरली ब्रिटिश कलाकार अन् आदिवासी कन्येची प्रेमकहाणी?

| Updated on: Feb 14, 2022 | 12:48 PM

1804 मध्ये लंडनमध्ये जन्मलेला रॉबर्ट गिल या वयाच्या 19 व्या वर्षी इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाला. सैन्यात आला तरी रॉबर्ट एक चित्रकार होता. लंडन रॉयल एसियाटिक सोसायटीचा क्लासिफाइड आर्टिस्ट होता. त्याची आणि भारतीय आदिवासी कन्या पारोची ही प्रेमकहाणी..

औरंगाबाद | अजिंठ्यातील पारोची कबर संरक्षित करण्याची मागणी, कशी बहरली  ब्रिटिश कलाकार अन् आदिवासी कन्येची प्रेमकहाणी?
अजिंठा लेणीतील रॉबर्ट गिलचे छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद | अजिंठा येथील प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधली गेलेली पारोची (Ajanta Caves) कबर संरक्षित करण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिक संशोधक विजय पगारे यांनी केली आहे. अजिंठ्यातील स्थानिक कन्या पारो आणि प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार रॉबर्ट गिल यांच्यातील प्रेमकहाणी (Paro And Robert gill love story) या भागात प्रसिद्ध आहे. देश वेगळे, भाषा वेगळ्या तरीही परस्परांवर जीवापाड प्रेम करणारं हे जोडपं. अजिंठा लेण्यांची चित्र कॅनव्हासवर (Ajanta portraits) उतरवण्यासाठी आलेला तो आणि त्यात रंग भरण्यासाठी जंगलातल्या फुलांचे रंग आणून देणारी ती यांची प्रेमकहाणी जेवढी रंजक आहे, तितकंच कहाणीचं आयुष्यही अगदी कमी आहे. ही प्रेमकहाणी केवळ दहा वर्षेच चालली. पारोच्या अचानक मृत्यूनंतर रॉबर्ट गिल याने तिची कबर अजिंठा येथे बांधली. तर नंतर काही वर्षानंतर रॉबर्टच्या मृत्यूनंतर त्याची कबर भुसावळ येथे बांधण्यात आली. अजिंठा येथील पारोची कबर आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित झाली आहे, असा आरोप स्थानिक संशोधकांकडून केला जातोय. पुरातत्त्व विभागाने तिला संरक्षण द्यावे, अशी मागणी केली जातेय.

कोण होता रॉबर्ट गिल?

1804 मध्ये लंडनमध्ये जन्मलेला रॉबर्ट गिल या वयाच्या 19 व्या वर्षी इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाला. सैन्यात आला तरी रॉबर्ट एक चित्रकार होता. लंडन रॉयल एसियाटिक सोसायटीचा क्लासिफाइड आर्टिस्ट होता. त्याच्यातील सुप्त गुण ओळखून 1 ऑक्टोबर 1844 रोजी इस्ट इंडिया कंपनीने त्याला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी ड्राफ्समन म्हणून त्याची नियुक्ती केली. 13 मे 1845 मध्ये सतरा सुरक्षा जवानांसह रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. त्यानंतर त्याच्या चित्रांसाठीचं साहित्यही पोहोचवलं गेलं. तत्कालीन जंगल आणि भिल्लांपासून संरक्षण मिळावे, यासाठी गिलसोबत शरीरक्षक देण्यात आले होते. अनेकदा चित्रांसाठी त्याला आठ-दहा दिवस येथील गुहांमध्ये वास्तव्य करावे लागले होते.

लेणापूरची आदिवासी कन्या पारो..

1845 मध्ये अजिंठ्यात आल्यावर अजिंठ्याच्या लेण्यांत उत्खननाचे काम जोरात सुरु होते. हजारो मजूर यात गुंतले होते. यातच एक म्हणजे लेणापूर गावची आदिवासी कन्या पारो. या परिसरातील खडान् खडा माहिती असलेली पारो गिल यांना मदत करायची. हळू हळू मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रेमाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. दोघांमध्ये तब्बल 10 वर्षांचे सहजीवन होते. त्यानंतर ग्रामस्थांनी तिला विष पाजून मारले, असे काहीजण सांगतात. तर काही जण म्हणतात, त्या काळातील प्लेगच्या साथीत तिचा मृत्यू झाला.

अजिंठा लेणी क्रमांक 1 चे रॉबर्ट गिलने काढलेले चित्र, संदर्भ- विकीपीडिया

रॉबर्ट गिलची चित्रकारी अन् फोटोग्राफी

गिलने मोठ्या कष्टानं काढलेली चित्रे मद्रासला पाठवण्यात येत होती. त्यानंतर ती लंडनला जात होती. लंडनला अजिंठा येथील चित्रांचे पहिले प्रदर्शन भरवले गेले होते. मात्र 1866 मध्ये लंडनच्या क्रिस्टल हॉल नावाच्या भव्य वास्तूला मोठा आग लागली आणि गिलची तपश्चर्या एका क्षणात भस्मसात झाली. त्यानंतरही गिलने चित्रकारी आणि फोटोग्राफी सुरु ठेवली. त्याचे असंख्य फोटो ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाइन वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

नितीन देसाईंच्या अजिंठा चित्रपटातून प्रसिद्धी

2012 मध्ये नितीन देसाईचा अजिंठा चित्रपट आला त्यानंतर रॉबर्ट गिल आणि पारोची प्रेमकहाणी आणखीच चर्चेत आली. ना. धो. महानोरा यांच्या कवितांना चित्ररुप देऊन रुपेरी पडद्यावर आणले गेले. सैनिकी पेशाचा हा चित्रकार अजिंठ्याची लेणी पाहून मंत्रमुग्ध होतो आणि भारतीय आदिवासी कन्या त्याच्यावर भाळते, याचीच ही कहाणी. रॉबर्ट आणि पारो यांचा विवाह झाल्याची नोंद इतिहासात नाही. 1854-55 मध्ये भारतात प्लेगची लाथ आली. 23 मे 1856 ला पारोचा मृत्यू झाला. रॉबर्ट अतिशय दुःखी झाला. त्याने अजिंठ्यात सिल्लोड तालुक्यात तिची कबर बांधली. आज या कबरीच्या बाजूलाच अजिंठा पोलीस स्टेशन आहे. काही काळानंतर रॉबर्ट अन्य एका स्त्रीच्या सहवासात आला. त्यानंतर दोन अपत्येही झाली. 1879 च्या पहिल्या आठवड्यात भुसावळ येथील रुग्णालयात रॉबर्ट गिलचा उष्माघातानं मृत्यू झाला. भुसावळ रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या दफनभूमीत त्याची कबर आहे. मात्र पारोची अजिंठ्यातील कबर दुर्लक्षित असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तिला योग्य संरक्षण देण्याची मागणी स्थानिक संशोधकांनी केली आहे.

संदर्भः अजिंठ्याचा इतिहास जहासमोर आणणारा पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल- समाधान महाजन- https://bolbhidu.com/

इतर बातम्या-

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा Valentine’s Day! फोटो शेअर करत मलायला म्हणाली “तू माझा आहेस…”, तर अर्जुन म्हणतो…

Nashik leopard | सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अखेर जाळ्यात; पण तरीही भीती कायम, कारण…