प्रवाशांनो, लक्ष द्या! मुंबई लोकलमध्ये होणार महत्त्वाचे बदल, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबई लोकलच्या ट्रान्सहार्बर मार्गावर प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेने नेरूळ-बेलापूर-उरण मार्गावर १० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे गर्दी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल. तसेच, तारघर आणि गव्हाण ही दोन नवीन रेल्वे स्थानके लवकरच खुली होतील.

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलमध्ये मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने एका मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता नेरूळ-बेलापूर-उरण मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी दोन नवीन अत्याधुनिक रेल्वे स्थानकेही प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.
मध्य रेल्वेत होणार मोठे बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारकडे ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांकरिता विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील काही मागण्या मान्य झाल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार आता मध्य रेल्वेने बेलापूर-उरण या महत्त्वाच्या कॉरिडॉरवर एकूण १० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे या मार्गावरील दैनंदिन फेऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. ज्यामुळे सध्या दोन लोकल गाड्यांमध्ये असलेले मोठे अंतर कमी होणार आहे. मध्य रेल्वेकडून नेरूळ-उरण-नेरूळ मार्गावर ४ अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्यात येणार आहे. तर बेलापूर-उरण-बेलापूर मार्गावर ६ अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत.
या वाढीव फेऱ्यांमुळे, विशेषतः गर्दीच्या वेळी, लोकलच्या वेळेतील अंतर कमी होऊन प्रवाशांना जलद, नियमित आणि आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. उरण मार्गावर सध्या दिवसाला अंदाजे ४० फेऱ्या धावत होत्या. त्या आता वाढीव फेऱ्यांमुळे ५० किंवा गरजेनुसार ६० पर्यंत वाढवण्याची योजना आहे. जेणेकरून प्रवाशांची गर्दी प्रभावीपणे हाताळता येईल. या लोकल फेऱ्या वाढवण्यासोबतच, तारघर आणि गव्हाण ही दोन नवीन रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी अंतिम टप्प्यात आहेत. या स्थानकांचे बांधकाम जवळपास ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही स्थानके लवकरच खुली करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सुरु होणार स्टेशन
तारघर हे स्थानक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) अगदी जवळ आहे. यामुळे भविष्यात विमानतळाचे कर्मचारी, प्रवासी आणि या परिसरातील रहिवाशांसाठी हे स्टेशन एक महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी पॉइंट ठरणार आहे. तर गव्हाण हे स्थानक खारकोपर आणि शेमाटीखार दरम्यान बांधण्यात आले आहे. यामुळे उरण आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना उपनगरीय रेल्वे जाळ्याशी जोडले जाणे अधिक सोपे होणार आहे. ज्यामुळे त्यांच्या रोजच्या प्रवासाची सोय सुधारेल.
यामुळे उरण थेट मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या भागांशी जोडले जाईल. वाढीव फेऱ्या आणि नवी स्थानके सुरू झाल्यामुळे या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल, तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल, असे बोललं जात आहे.
