त्याच्या हातात इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तक होतं, अचानक हातात दगड घेतले, संभाजीनगरात काय घडलं?

| Updated on: Mar 16, 2023 | 10:14 AM

Sambhajinagar | शहरात बाबा पेट्रोल पंप परिसरात घडलेल्या विचित्र घटनेनं शहरात खळबळ माजली आहे.

त्याच्या हातात इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तक होतं, अचानक हातात दगड घेतले, संभाजीनगरात काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी (English) शिकण्यासाठीची पुस्तके हातात असलेल्या तरुणाबाबत एक विचित्र घटना शहरात घडली. संभाजीनगरातील (Sambhajinagar) बाबा पेट्रोलपंप चौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. सकाळच्या वेळी एक तरुण बाबा पेट्रोलपंप जवळील कर्णपुरा परिसरातून आरटीओ ऑफिसकडे जात होता. त्याच्या हातात इंग्रजी बोलण्यासाठीची पुस्तके होती. पुस्तकं विकत असतानाच अचानक या तरुणाने हातात दगड घेतले अन् रस्त्यावरील वाहनांवर फेकायला सुरुवात केली. पहिल्या कारवर दगड मारल्याने तिची पुढची काच फुटली. या कृत्यामुळे कारचालकाने गाडी थांबवली, तोच त्या तरुणाने मागील कारवर दगडफेक करायला सुरुवात केली. बाबा पेट्रोलपंप परिसरात या घडनेने काही काळ चांगलीच खळबळ माजली.

माथेफिरूने ४ कारच्या काचा फोडल्या

संभाजीनगरात खळबळ माजवलेल्या या घटनेतील तरुणाचे मानसिक संतुलन बिघलेलेले होते. हातात इंग्रजी शिकण्याचे पुस्तक घेऊन तो चालत होता. मात्र अचानक त्यानं चालत्या वाहनांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या घटनेत रस्त्यावरील चार कारच्या काचा फुटल्या. यामुळे बाबा पेट्रोल पंप चौक ते रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ गोंधळ उडाला. बुधवारी सकाळच्या सुमारासची ही घटना आहे.

जमावानं दिला चोप

दरम्यान, कारावर दगडफेक करणारा तरुण माथेफिरू असल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जमावाने त्याला पकडलं. तिथेच त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेत सदर तरुण जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मगन गांगे असं या तरुणाचं नाव आहे. तो मुकुंदवाडी परिसरातील संत रोहिदास नगर येथील रहिवासी आहे. संजय गांगे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारमालकानेच अखेर वाचवलं…

सदर घटनेत ज्या कारचं नुकसान झालं, त्याच मालकाने जमावाच्या तावडीतून तरुणाची सुटका केली. राजाराम दिंडे यांच्या कारवर तरुणाने दगड मारला. काच फुटल्यानंतर त्यांनी कार बाजूला घेतली. तोपर्यंत जमावाने तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली होती. दिंडे यांनी जमावात घुसून तरुणाला बाजूला नेलं आणि पोलीस येईपर्यंत जमावाला रोखून धरलं. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्याला वाचवल्याचं दिंडे यांनी सांगितलं.