आधी औरंगजेबाच्या थडग्यावर गुडघे टेकले, आता एमआयएमच्या आंदोलनात थेट औरंगजेबाचा फोटो

| Updated on: Mar 04, 2023 | 7:08 PM

एमआयएचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केलाय. औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करण्यासाठी त्यांनी आज उपोषण सुरु केलं. त्यांच्या आंदोलनात एक विचित्रप्रकार बघायला मिळाला.

आधी औरंगजेबाच्या थडग्यावर गुडघे टेकले, आता एमआयएमच्या आंदोलनात थेट औरंगजेबाचा फोटो
Follow us on

औरंगाबाद : एमआयएचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतराला विरोध केलाय. औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करण्यासाठी त्यांनी आज उपोषण सुरु केलं. त्यांच्या आंदोलनात एक विचित्रप्रकार बघायला मिळाला. जलील यांच्या आंदोलनात काही आंदोलकांनी थेट औरंगजेबाचा फोटो झळकावला. विशेष म्हणजे हा फोटो बराचवेळ आंदोलनात झळकावण्यात आला. पण कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. नंतर संबंधित प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित फोटो तिथून हटवण्यात आला.

या प्रकारावर इम्तियाज जलील यांनी आपण त्या फोटोचं समर्थन करत नाही, असं म्हटलं आहे. पण एमआयएमकडून औरंगजेबाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळीदेखील महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं.

इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया काय?

“मी त्याचं समर्थन करत नाही. कुणी आणलं होतं. पण मी लगेच बाहेर काढलं. आमचं मिशन स्पष्ट आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. मला माहिती आहे की, तो फोटो घेऊन इथे कुणी पाठवलं आहे. मी त्या कृत्याचं समर्थन करत नाही”, असं स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी संबंधित प्रकारावर दिलं आहे.

चंद्रकांत खैरे यांचा खोचक सवाल

या मुद्द्यावरुन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना खोचक प्रश्न विचारला आहे. “तुमच्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरा, कार्यकर्ताचं नाव औरंगजेब आहे का? आमच्या घरी सगळ्यांचं नाव संभाजी, शिवाजी अशी नावं दिलेलं असतात. बी टीमचे मालक त्यांना फूस देतात हे हळहळू काही लोकांनी मला सांगितलं आहे”, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

अब्दुल सत्तार यांची टीका

दरम्यान, औरंगजेबाच्या फोटोवरुन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. कुणीही महाराष्ट्राचं वातावरण खराब होणार नाही याची काळजी घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. “कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नामांतराचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार जनतेसाठीच निर्णय घेतं. त्यामुळे या निर्णयाला विरोध म्हणून आंदोलन करताना महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी जलील यांनी घेतली पाहिजे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.