पुलावरून उडी खायची का?, उद्धव ठाकरे भेट देत असणाऱ्या पेंडापूरच्या शेतकऱ्यांचा सवाल

कृषीमंत्री रस्त्यावरून जातात पण गावात आणि शेतात येत नाहीत.

पुलावरून उडी खायची का?, उद्धव ठाकरे भेट देत असणाऱ्या पेंडापूरच्या शेतकऱ्यांचा सवाल
पेंडापूरच्या शेतकऱ्यांचा सवाल
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 23, 2022 | 2:30 PM

औरंगाबाद : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ते पेंडापूर या गावात भेट देणार आहेत. तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. शेतकरी म्हणतात, आमच्या शेतात पाणी घुसलं, आख्ख पीक वाहून गेलं. मका, सोयाबीन पाण्यात गेले आहेत. अधिकारी लोकं तिथं गेल्यानंतर धुळकावून लावतात. मोसंबीची झाडं लावली. त्याला दोन महिने झाले. तहसील कार्यालयातले लोकं उडवाउडवीची उत्तरं देतात. मग शेतकऱ्यांनी (Farmer) काय करायचं. पुलावरून उडी खायची की काय करायचं. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देतात. त्यामुळं त्यांना पगार कशाचा देता, असा सवाल शेतकऱ्यानं केला.

परतीच्या पावसानं पार वाट लावली आहे. हातातोंडाशी असलेला घास हिरावून नेला. घोषणा झाल्या पण, शेतकऱ्याच्या खांदावर अजून एक रुपयासुद्धा आला नाही. शेतकऱ्याच्या घरात गोडधोड करायला एक रुपयासुद्धा शिल्लक राहिला नाही.

पाऊस असा झाला की, घरं राहिली नाही. पिकं राहिली नाही. किट अजून पोहचली नाही. दिवाळी नाही, आज दुष्काळ आहे. सरकार किती देतं त्यावर अवलंबून आहे. अजूनपर्यंत कोण्या अधिकाऱ्यानं येऊन पाहिलं नाही. ना कुठला अधिकारी आला, ना कुठले लोकप्रतिनिधी आले.

कृषीमंत्री रस्त्यावरून जातात पण गावात आणि शेतात येत नाहीत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आमच्या जिल्ह्याचे असून आम्हाला आधार कुणाचाच नाही. आम्हाला या सरकारने वाऱ्यावर सोडलं, असल्याचा संतापही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. कृषिमंत्री बाहेर असतात. त्यांना भेटायची परवानगी मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

बोलेगाव, कनपुरी या सात-आठ गावाचं जीवन प्रकल्पावर आहे. ते फुटून दोन वर्षे झालेत. पण, कृषिमंत्री आले नाहीत. मग, आमचं म्हणणं कोणापर्यंत पोहचवायचं, असा त्यांचा सवाल आहे.