Dilip Bade: मराठवाड्याचे पोर्ट्रेट मास्टर काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं हृदयविकाराने निधन!

| Updated on: Feb 07, 2022 | 9:29 AM

मूळचे अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले प्रा. दिलीप बडे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून त्यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरीत रुजू झाले. औरंगाबाद येथील गव्हर्नमेंट स्कूल ऑफ फाइन आर्टचे डीन या पदावरून ते निवृत्त झाले होते.

Dilip Bade: मराठवाड्याचे पोर्ट्रेट मास्टर काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं हृदयविकाराने निधन!
प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचे निधन
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्राच्या कलासृष्टीत पोर्ट्रेट मास्टर (Portrait master) अशी ओळख मिळालेले प्रसिद्ध चित्रकार दिलीप धोंडीराम बडे (Dilip Bade) यांचं औरंगाबादेत निधन झालं. मूळचे अंबाजोहाई येथील रहिवासी असलेले दिलीप बडे हे औरंगाबादमधील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून निवृत्त झाले होते. रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास प्रा. दिलीप बडे यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने ते पायी चालतच दवाखान्यात गेले. डॉक्टर तपासत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. 68 वर्षांचे दिलीप बडे हे औरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयाच्या (Milind Collage) समोरील नंदनवन वसाहतीत रहात होते. त्यांच्यावर छावणीतील स्मशानभूमीत अंत्यांसस्कार करण्यात आले.

प्रा. दिलीप बडे यांची गाजलेली तैलचित्रे

पोर्ट्रेट मास्टर अशी ओळख

मूळचे अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले प्रा. दिलीप बडे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून त्यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरीत रुजू झाले. औरंगाबाद येथील गव्हर्नमेंट स्कूल ऑफ फाइन आर्टचे डीन या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या चित्रकलेच्या कारकीर्दीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व बाळासाहेब ठाकरे आदींची पोर्ट्रेट सर्वाधिक काढली आहेत. पोर्ट्रेट आर्टिस्ट अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काढलेले तैलचित्र विधान भवन, औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महापालिकेतही लावलेले आहेत. विशेषतः निळी साडी परिधान करून खुर्चीवर बसलेल्या रमाबाई आंबेडकरांचे पोर्ट्रेट सर्वत्र वापरले गेले. इराणच्या तेहरान विद्यापीठ आणि भोपाळसह देशभरात त्यांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत.

अनेक चळवळींत सक्रिय

विद्यार्थी दशेत असताना दिलीप बडे यांनी दलित युवक आघाडीत काम केले. नामांतर चळवळीत सक्रिय योगदान दिले होते. नामांतरातील हिंसाचाराला उत्तर म्हणून दलित साहित्य संमेलने व्हावीत, अशी कल्पना त्यांनी मांडली होती. तत्पूर्वी दलित साहित्य संसदची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली होती. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांत त्यांनी काम केले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सतर्फे दिल्या जाणाऱ्या डोली करसेटीजी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयातील प्रदर्शनात त्यांना रौप्यपदक मिळाले. इंडो-अरब सोसायटीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पुण्यातील बी व्ही ओक आर्ट एक्झिबिशनचा, महाराष्ट्र राज्य सरकारचा 2000 सालचा पुरस्कार आणि राज्य शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

इतर बातम्या-

एअर इंडियाच्या सिनिअर पायलटचा करुण अंत, गॅस गिझर गळतीने बाथरुममध्येच गमावले प्राण

केस गळती, पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ हेअर मास्क एकदा लावा आणि समस्यांना कायमचे गुड बाय बोला…