अखेर बॉम्ब फुटला… एकनाथ शिंदेंनी घेतले 500 कोटी? कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; महाराष्ट्रात मोठी खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एका महिलेने श्रीकांत शिंदेमार्फत जरांगेंना ५०० कोटी पोहोचल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. जरांगे यांनी याबाबतचा पुरावा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. आपल्याकडे एक ऑडिओ क्लिप असल्याचं जरांगे म्हणाले होते. ही ऑडिओ क्लिप मीडियासमोर सादर करण्यापूर्वीच ती व्हायरल झाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला शिंदेंना 500 कोटी रुपये दिल्याचं म्हणत आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून मोठा आरोप केला होता. भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन ते मला दिल्याचं भाजपला सांगितलं का? असा सवाल जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना केला होता. यावर एकनाथ शिंदेंनी आपण कोणाकडून पैसे घेतलेही नाही आणि दिलेही नाहीत म्हणत पुरावे द्यावेत असं म्हटलं होतं. यानंतर एक कथित रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून यामध्ये एका महिलेचा हिंदीमधला संवाद ऐकायला येत आहे.
काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?
या क्लिपमध्ये दोन महिलांचे संवाद ऐकू येत आहेत. एक महिला अधिक बोलताना दिसत आहे. ही छोटी ऑडिओ क्लिप आहे. मात्र, त्याची पुष्टी आम्ही करत नाही. पहिली महिला म्हणते, जरांगे पाटील यांना ऑलरेडी 500 कोटी रुपये पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदेमार्फत हे पैसे दिले आहेत. आता जरांगे पाटील विधानसभेत आमच्या फायद्याचे राहतील नाही राहणार याबाबतचं माझं मत वेगळं आहे. कॅलक्यूलेशन वेगळं आहे. बाकी तुम्ही जो विचार करत आहात… जे तथ्य आहेत ते आहेच, असं ही महिला म्हणते. यावर दुसरी महिला म्हणते, परंतु मला जे वाटतंय ते… त्यानंतर दोन्ही महिलांचा संवाद संपतो.
जरांगे काय बोलणार?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आजच्या पत्रकार परिषदेत हीच क्लिप ऐकवणार आहेत. तसेच क्लिपमध्ये बोलणाऱ्या महिल्या कोण आहेत याचा शोध घेण्याचं आव्हान ते शिंदेंना करणार आहेत. तसेच तुम्ही 500 कोटी रुपये घेतले की नाही? मग हे संवाद का व्हायरल होत आहेत? भाजपकडून माझा गेम केला जातोय की तुमचा गेम केला जातोय? असे सवालही जरांगे विचारण्याची शक्यता आहे.